धुळे जिल्ह्याचा 3576 कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन



  धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : ‘नाबार्ड’ने धुळे जिल्ह्याचा सन 2022-23 करीता 3576.32 कोटी रुपयांचा  संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- 2022-23) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.
  यावेळी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, नाबार्ड चे महाप्रबंधक विवेक पाटील, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास यांचेसह विविध बँकाचे प्रतिनिधी, शासकीय विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते
‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पीएलपी) हा एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘नाबार्ड’ द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व  बँकांना विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात. नाबार्डतर्फे प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग प्रणालीद्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडते.  
  या आराखड्यात सन 2022-23 करीता धुळे जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- 2022-23) एकूण 3576.32 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी रुपये 1776.04 कोटी, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी रुपये 1181.70 कोटी आणि इतर प्राथमिक  क्षेत्रासाठी रुपये 212.51 कोटी रुपये प्रामुख्याने प्रस्तावित केले आहेत. यात शेती, शेतीपूरक क्षेत्रात प्रामुख्याने पीक कर्जासाठी रुपये 1074.85 कोटी, सिंचनासाठी रुपये 73.65 कोटी, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी रुपये 17.06 कोटी, पशुपालन (दुग्ध) रुपये 117.83 कोटी, कुक्कुटपालन रुपये 15.44, शेळी मेंढीपालनासाठी रुपये 62 कोटी, गोदाम/शीतगृहासाठी रुपये 76.16 कोटी, भूविकास, जमीन सुधारणा रुपये 41.40 कोटी, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी रुपये 138.42 कोटी प्रस्तावित केले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज रुपये 247.20  कोटी, शैक्षणिक कर्ज रुपये 96.32 कोटी इतका वित्त पुरवठ्याचा समावेश आहे. 
             यावेळी धुळे जिल्ह्यातीलन बँकांनी पात्र पीककर्ज धारक शेतक-यांना कर्जाचा पुरवठा प्रामुख्याने करावा, पशुपालक व दुगध व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्याने वित्त पुरवठा करण्याबरोबरच शेतमालाची साठवणूक, वाहतुक या सुविधांनाही प्राधान्य द्यावे. विविध विकास महामंडळांकडून प्राप्त प्रस्तावांची छानणी तातडीने करुन पात्र वैयक्तिक लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. शर्मा  यांनी दिले. 
              याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तसेच विविध महामंडळामार्फत बँकाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांची तसेच बँकांनी केलेल्या कर्ज वितरणाचाही आढावा घेण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने