धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणू बरोबरच त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड19 लसीकरण मोहिमेला गती द्यावी. त्याबरोबरच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, शिक्षणाधिकारी मोहन देसले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, की शासनाने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. कोविन सिस्टिमवर 1 जानेवारी, 2022 पासून नोंदणी सुरू होईल, तर 3 जानेवारी, 2022 पासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात होईल. त्यानुसार आरोग्य आणि शिक्षण विभागाने समन्वय साधून शाळास्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी आधार व मोबाईल क्रमांकासह तयार करावी. तसेच आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर, 60 वर्षावरील सहव्याधी रुग्णांना प्रीकाशन डोस देण्यात येणार आहेत. त्याचेही आरोग्य विभागाने नियोजन करावे. आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर यांना दुसरा डोसपासून 9 महिने किंवा 39 आठवडे, तर 60 वर्षावरील व सहव्याधी रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याने हा डोस देण्यात यावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाने आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करून घ्यावी. आवश्यक औषधे, ऑक्सिजनचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजना, लसीकरणाचे नियोजन याविषयीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
Tags
news