धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय संविधानाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिकच आहे. या सर्वसामान्य नागरिकांसह वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोफत कायदेविषयक सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांनीही आपापसातील वाद, तंटे सामोपचाराने मिटविण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व जिल्हा वकील संघ यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मोफत कायदेविषयक सेवा केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम आज सकाळी चुडामणनगर, पुरमेपाडा, ता. जि. धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्र तवर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप पाटील, सरपंच सीमा जाधव आदी उपस्थित होते. यानिमित्त ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व ‘कोविड- 19’ लसीकरण शिबिराचे आयोजन आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते.
न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले, नागरिकांना कायद्यांची माहिती व्हावी, त्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य कळावेत म्हणून न्यायालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. यामागील उद्देश म्हणजे न्यायालय आणि नागरिकांमधील संवाद वृध्दिंगत करीत पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे. नागरिकांनी आपापसातील किरकोळ वाद, तंटे सामंजस्याने सोडवावेत. त्यासाठी मोफत कायदेविषयक सेवा केंद्र उपयुक्त ठरतील. या केंद्राच्या माध्यमातून विधी तज्ज्ञ नागरिकांना मार्गदर्शन करतील. महिला, गरीब नागरिकांना आता गावापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत विधी सेवा केंद्राच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन मोफत मिळू शकते, असेही न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद म्हणाले, समाजातील तळागाळातील घटकापर्यंत कायद्याची माहिती पोहोचविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोफत कायदेविषयक सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. महिलांचा आदर करीत आपापसातील तंटे सामोपचाराने मिटवावेत. गुन्हा किंवा अपघात घडल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आजचा उपक्रम राबविण्यात आला आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे संविधानाचे मुख्य स्तंभ आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक विषयात कायद्याचा संबंध येतो. त्यामुळे नागरिकांनी कायद्यांची माहिती घेतली पाहिजे. हे सेवा केंद्र चुडामणनगरसह परिसरातील ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. पोलिस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, विधी सेवा प्राधिकरणाचा हा उपक्रम आदर्श आणि अनुकरणीय आहे. विधी प्राधिकरण, महसूल आणि पोलिस विभागाच्या समन्वयातून न्याय देण्याचा प्रयत्न होईल, असे सांगितले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले, विधी सेवा केंद्राच्या माध्यमातून कायदेविषयक माहिती मोफत मिळणार आहे. असे असले, तरी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे देखील पालन केले पाहिजे. महामार्गालगत असलेल्या रहिवाशांनी वाहतुकीचे नियम, वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा विमा याविषयी सजग राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डोंगरे यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news



