प्रत्येक विभागाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे! : निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांच्या बैठकीत निर्देश




धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग प्रमुखाने सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिले.




जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, उपवनसंरक्षक माणिक भोसले, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतर्लीकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये विनापरवाना केलेले सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण हा गुन्हा आहे. या कायद्यान्वये आपापल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता विद्रुपीकरण झालेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करावा. तसेच संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून विहित वेळेत अहवाल सादर करावेत. या निवडणुकीसाठी लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच कार्यवाही करावयाची आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी नमूद केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अंतुर्लीकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने