शिरपूर वार्ताहर,
शिरपूर तालुक्यातील मौजे फत्तेपूर फाॅरेस्ट येथील रेशन दुकान क्र. १३२ यांचा दुकान चालवण्याचा परवाना कायमचा रद्द करण्याबाबत गावातील लोकांनी मा. तहसीलदार शिरपूर यांना लेखी स्वरूपात दि. ०८/११/२०२१ रोजी तक्रार दिली होती. त्याचा राग येवून रेशनचा संबंध नसलेले रूमाल पावरा व भिकला पावरा यांनी तक्रारदारावर जीवघेणा हल्ला चढवून गंभीररित्त्या जखमी केले आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केलेली आहे.
तहसिलदार व पुरवठा अधिकारी शिरपूर यांना रूपसिंगपाडा, रोलसिंपाडा, सकऱ्यापाडा ता. शिरपूर येथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात फत्तेपूर (फॉ) ता. शिरपूर येथील रेशन दुकानदार शासन नियमानुसार गावातील लाभार्थ्यांना धान्य मिळत देत नाही. विचारणा केल्यावर दादागिरी करणे, अन्न सुरक्षा कायदा पायदळी तुडवणे आदींचा उल्लेख केला होता.त्याचा राग येवून काल दि. १०/११/२१ गावातील रुमाल पावरा व भिकला पावरा यांनी काकड्या पावरा याला तुम्ही रेशन संदर्भात तक्रार का केली म्हणून मारहाण केली. त्यामुळे काकड्या पावरा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक हात फॅक्चर झाला आहे. एकीकडे तालुक्यात रेशनचा माल सर्रास काळ्या बाजारात विकला जातो. आणि खरे लाभार्थी त्या पासून वंचित राहत. तर नियमानुसार धान्य मिळावे म्हणून मागणी करणाऱ्यांवर थेट जीवघेणा हल्ला चढवला जातोय. रितसर तक्रार करूनही दुकानदारावर कारवाई होण्याऐवजी तक्रारदारावर हल्ला होतो याला तहसीलदार आणि पुरवठा विभागही जबाबदार आहे. असा आरोप बिरसा फायटर्स संघटनेने केलेला आहे.जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Tags
news




