शिरपूर : धुळे व नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठीच आतापर्यंत मी प्रयत्न केले असून बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी देखील बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नाने बँक सुरळीत सुरू आहे. यापुढे देखील बँकेच्या प्रगतीसाठी व सर्वसामान्यांना बँकेमार्फत योग्य ते सहकार्य मिळण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मतदान करावे असे मत माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांनी व्यक्त केले.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी किसान विद्या प्रसारक संस्था संचलित शिरपूर शहरातील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूलच्या प्रांगणात शनिवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचा तालुकास्तरीय मेळावा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सुरेश भामरे पाटील, दर्यावसिंग महंत, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सभापती नरेंद्रसिंह जमादार, सौ. शिलाताई विजय पाटील, सौ. सीमाताई तुषार रंधे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तरसिंग पावरा, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, किरण पाटील उपस्थित होते. मेळाव्यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून भाईंच्या आवाहनानुसार आपण सर्वांनी मतदान करावे.
जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पॅनेलच्या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी मतदान करावे. जिल्हा बँकेमार्फत आतापर्यंत उत्कृष्टपणे काम करण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात देखील जिल्हा बँकेमार्फत चांगले काम करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेसाठी चांगले काम करण्याच्या प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध संचालक तसेच शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी करून मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. जिल्हा बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बाबत माहिती देऊन उमेदवार यांचा परिचय करून दिला.
Tags
news
