शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील मंदाणे शिवारात १५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या ऊसाच्या शेताला अचानक आग लागून सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. संध्याकाळी उशिरापर्यंत शहादा , पानसेमल येथील अग्निशामक दल व ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले मात्र वारा असल्याने या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी पंचनामा करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मंदाणे शिवारातील वडगाव रस्त्यालगत सर्व्हे नंबर ४२ मध्ये गुलाबराव माधवराव मोरे व शहादा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर गुलाबराव मोरे यांच्या १५ एकर क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आली होती. काही दिवसांनी ऊसाची तोडणी करण्याचे नियोजन केले जात असताना काल गुरुवारी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेताला अचानक आग लागल्याचे वृत्त गावात येऊन धडकले. घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी मदत कार्य सुरू केले. शेताचे मालकही घटनास्थळी पोहोचले. वाराही असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. जवळच असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल व शहादा येथील नगरपालिकेचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले . शेतात ऊसाला नुकतेच पाणी सोडलेले होते. त्यामुळे बंब शेतात नेण्यास खूपच कसरत करावी लागली. अखेर संध्याकाळी उशिरापर्यंत आग विझवण्यात यश मिळाले. तो पर्यंत मोठ्याप्रमाणात ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
◆◆ *८ लाखाचे नुकसान*
तब्बल पंधरा एकर क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या ऊसाला आग लागल्याने या घटनेत सुमारे ८ लाखाचे नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी सुनील खैरनार व तलाठी एच. पी. धनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर केला. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही.
Tags
news
