शिरपूर शहरात प्लास्टिक बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशास व्यापाऱ्यांकडून हरताळ





शिरपूर प्रतिनिधी -  राज्यात प्लास्टिक बंदी च्या कायदा लागू झाल्यानंतर सदरची प्लास्टिक बंदी सक्तीने लागू करण्यात आली होती व याबाबत साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात व  किरकोळ व्यापाऱ्यांच्या विरोधात व वापर करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात शक्तीने कारवाई केली जात होती व शासन स्तरावरून दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचे देखील काम यापूर्वी झाले आहे .


मात्र सदर कायदा नव्याचे नऊ दिवस साजरा करण्यात आला आणि यानंतर प्रशासन आणि व्यापारी या दोघांना या कायद्याच्या विसर पडला आणि आता उघड पणे बाजारात होलसेल प्लास्टिकचे व्यापारी सर्रासपणे बंदी असलेला प्लास्टिक चा माल विकत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजारात प्लास्टिक कॅरीबॅग च्या वापरात वाढ झाली आहे.


शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पदी नुकताच मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पदभार स्वीकारला सर्वप्रथम त्यांनी शिरपूरकर जनतेला आवाहन करत पूर्णपणे प्लास्टिकचा वापर टाळून प्लास्टिक बंदी अमलात आणण्याबाबत आवाहन केले. मात्र सदरच्या आवाहनाला प्लास्टिक विक्रेता व्यापाऱ्यांकडून ठेंगा दाखवण्यात आला असून या आदेशाच्या विरोधात शहरातील मेन रोडवरील प्लास्टिक कॅरीबॅग चे होलसेल विक्रेत्यांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उघडपणे होलसेल प्लास्टिक विक्री सुरू ठेवली आहे .राज्यात प्लास्टिक बंदी असताना व कठोर कायदे लागू असताना शहरात सर्रासपणे प्लास्टिकची विक्री होत असेल व त्यावर प्रशासनाची कोणतेही लगाम नसेल तर मात्र याबाबत शंकेला वाव आहे. शासन आदेशानुसार 30 सप्टेंबर 2019 पासून 75 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वर बंदी असून 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी करण्यात आलेली आहे.


 मात्र शहरात उघडपणे प्लास्टिकची विक्री आणि वापर होत असताना या प्रकाराकडे शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस विभागाने अर्थपूर्ण डोळेझाक केली आहे का ? याबाबत प्रश्न उपस्थित होत असून किमान यापुढे तरी नगरपरिषदने शहरात शक्तीने प्लास्टिक बंदी करेल काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात प्लास्टिक विक्रीत वाढ झाली असून शासन नियमांचे व कायद्याचे देखील उल्लंघन होत आहे. पर्यायाने निसर्गाची देखील हानी होत असून प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे देखील मुक्या जनावरांना व पर्यावरणाला हानी पोहोचत आहे त्यामुळे यापुढे शहरात सक्तीची प्लास्टिक बंदी लागू करून मेन रोड वरील होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करून नागरिकांना याबाबत जागरूक करून प्लास्टिक बंदी ची मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने