पुणे : – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने विवाहितेच्या प्रियकराचा खून करुन मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावधन येथे घडला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
असा केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एका संशयिताच्या पत्नीचे त्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
21 ऑक्टोबरच्या रात्री आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर दोन मिस्ड कॉल बघितले. ते त्या तरुणाच्या मोबाइलवरुन आले होते.
यावरुन त्याने पत्नीला जाब विचारला. त्यानंतर ती घरातून पळून गेली. त्याच रात्री तो तरुण तिला भेटण्यासाठी गेला.
त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
त्यानंतर उरवडे येथील एका दारुच्या हातभट्टीत तरुणाचा मृतदेह टाकून जाळला.
आरोपीने मध्य प्रदेशात पळून जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
चप्पलमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मयत तरुणाच्या आईने 22 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. तिने तिघांवर संशय व्यक्त केला होता.
या तीन आरोपींपैकी एकजण बावधनमध्ये राहतो. त्याच्या घराबाहेर बेपत्ता मुलाची चप्पल तिने बघितली होती.
त्यावरुन संशय बळावला आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला.
राख जवळच्या नाल्यात फेकली
आरोपींनी तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दारूच्या हातभट्टी मध्ये जाळून टाकला.
मृतदेह संपूर्ण जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडं आणि पायामध्ये काही वर्षापूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला.
त्यानंतर हे पोतं आरोपींनी जवळच्या नाल्यात फेकलं.
जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. आरोपींनी ज्या ठिकाणी लोखंडी रॉड टाकून दिला तो पोलिसांनी हस्तगत केला आहे.
