धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेसाठी शंभर टक्के निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी हा निधी विहित कालावधीत शंभर टक्के खर्च होईल, असे नियोजन करावे. तांत्रिक मान्यता घेवून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हा वार्षिक योजना सन 2021- 22, जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेसाठी शंभर टक्के निधी प्राप्त झाला असून प्रत्येक विभागाने तांत्रिक मान्यतेसह प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत. पुढील महिन्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागप्रमुखाने जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांना गती द्यावी. ज्या विभागांकडे दायीत्व असेल त्यांनी तातडीने माहिती सादर करावी. तसेच प्रत्येक प्रस्ताव I-PASS या संगणकीय प्रणालीवरच सादर करावा. याशिवाय उपयोगिता प्रमाणपत्रे तातडीने सादर करावीत, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2021- 22 करीता ऑक्टोबर 2021 पर्यंतचा खर्चाचा व दायीत्व मागणी, शंभर टक्के निधीच्या मर्यादेत नवीन प्रस्ताव सादर करणे, ऑक्टोबर 2021 अखेर कोविड- 19 व जिल्हास्तरीय आरोग्य सुविधांचे बळकटीकरण याबाबतचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Tags
news



