धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार एक ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या मोहिमेत नव मतदार, तृतीय पंथी नागरिक, दुर्धर आजारग्रस्त नागरिक, दिव्यांग बांधव, जेष्ठ नागरिक व इतर वंचित घटकांनी विशेष करुन नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत किंवा करणार आहेत परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा तरुणांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्याकरीता फॉर्म क्रमांक सहा भरावा. मतदार यादीतील नाव कमी करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मयत होणे, स्थलांतर करणे किंवा असलेल्या मतदाराचे नावावर हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक सात भरावा. ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, अशा मतदारांनी देखील दुरुस्तीचा फॉर्म क्रमांक आठ भरावयाचा आहे.
वरील सर्व अर्ज ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा Voter Helpline App वर उपलब्ध आहे. सदरचे ॲप Google Play Store वरुन डाऊनलोड केल्यास त्यावर मतदार यादीतील नावांचा शोध घेणे, वरीलप्रमाणे नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव कमी करण्याची सुविधा, तसेच e Epic डाऊनलोड करणे, आपल्या मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूक विषयक चालू घडामोडी, निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जागरूक मतदार www.nvsp.in या संकेतस्थळावर सुध्दा मतदान नोंदणी विषयक वरील अर्ज ऑनलाईन स्वरूपात करु शकतात. या संकेतस्थळावर मतदार नोंदणी विषयक, e Epic डाऊनलोड करणे, मतदार यादीत नावाचा शोध घेणे, मतदार यादी उपलब्धतेची सुविधा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी Voter Helpline App डाऊनलोड करुन तसेच www.nvsp.in या Website वरील उपलब्ध ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा.
एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम असा : एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे- एक नोव्हेंबर 2021. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- एक ते 30 नोव्हेंबर 2021. विशेष मोहिमांचा कालावधी- 13 (शनिवार), 14 (रविवार), 27 (शनिवार), 28 नोव्हेंबर (रविवार) दावे व हरकती निकालात काढणे- 20 डिसेंबर 2021. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी- 5 जानेवारी 2022. जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्र (Epic) आहे. जे मतदार मयत झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी नमुना 7 व मृत्यू दाखला जोडून कुटुंब सदस्याचे नाव कमी करणे. ज्या कुटुंबियांनी / व्यक्तींनी स्थलांतर केलेले आहेत किंवा दोन वेळा नाव मतदार यादीत नोंदलेले आहे, त्यांनी सुध्दा नमुना 7 भरुन आपले नाव मतदार यादीतून कमी करणे, व धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची नावे नोंदण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.
Tags
news



