धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : दीपावली उत्सवादरम्यान खरेदीसाठी दुकानांवर व रस्त्यांवर गर्दी होत असते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. ज्येष्ठ नागरिक, बालकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत दीपावलीचा सण साजरा करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
या वर्षी दोन ते सहा नोव्हेंबर या कालावधीत दीपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘कोविड- 19’ या रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेवून गेल्या दीड वर्षांपासून सर्वधर्मीय सण, उत्सव साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरली असली, तरी कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून, गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
‘कोविड- 19’ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाच्या विभागांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. दीपावलीदरम्यान खरेदीसाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. या कालावधीत वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतो. कोरोना विषाणूचा आजार झालेल्या किंवा होवून गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके उडवू नयेत. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना विषयक नियम शिथिल केले असले, तरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शक्यतोवर असे कार्यक्रम ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक आदी माध्यमांद्वारे प्रसारित करण्यावर भर द्यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिर, रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवावेत. कोरोना विषाणू, मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता मोहीम राबवावी. तेथे ही नागरिकांनी एकाच वेळी एकत्रित येवू नये. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पीटिशन (सिव्हिल अपील) क्र.728/2015, 2865-2867/2021 मधील आदेशांचे तंतोतंत पालन करावे.
‘कोविड- 19’ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेही अनुपालन करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.
Tags
news



