भटके विमुक्त जातीजमातीच्या कर्मचाऱ्याच्या, अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करु नये : भाजपाची मागणी





शिरपूर : राज्य शासनाच्या वतीने दि 29/09/2021 रोजी सरकारी वकील नितीन पाटील यांनी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणा बद्दल मा सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात भटक्या विमुक्त जातीजमातींना आरक्षण देणे असंविधानिक आहे असे म्हटले आहे. ही बाब भटक्या समाजासाठी अत्यंत अन्यायकारक व घातक आहे. यामुळे केवळ सरकारी कर्मचारी, अधिकारीच नव्हे तर संपूर्ण भटक्या विमुक्त समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. भटके विमुक्त जातीजमातीच्या कर्मचाऱ्याच्या, अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करु नये. असे निवेदन शिरपूर तालुका भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, प्रदेश सदस्य रविंद्र भोई, तालुकाध्यक्ष अरविंद्र जाधव यांचा नेतृत्वाखाली तहसिलदार आबा महाजन यांना (दि.१२ आॅक्टो) रोजी देण्यात आले. निवेदनाची मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, जिल्हाधिकारी धुळे, प्रांतधिकारी शिरपूर यांना हि पाठवण्यात आल्या आहेत. शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी उत्तर महा. सहसंयोजक बदुलाल राठोड, शहराध्यक्ष दिपक धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, भटक्या विमुक्त मधील बहुतेक जातींची अनुसूचित जाती जमाती मध्ये समावेश व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अनुसूचित जाती जमाती प्रमाणेच भटक्या विमुक्ताना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण तसेच पोटासाठी भटकंती करणाऱ्या या समाजासाठी अक्ट्रोसिटी कायदा लागू करणे व अर्थसंकल्पात लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे यासर्व मागण्या अनेक वर्षांपासून हा समाज करत असताना त्यावर कोणतीही कार्यवाही न करता सध्या मिळत असलेले तुटपुंजे आरक्षणही मिळू नये यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाचा ढोंगी घोषणा करणारे आघाडी सरकारचा डाव दिसून येत आहे हा डाव संपूर्ण समाजाच्या लक्षात आला आहे. राज्यात सुमारे 20% असलेला हा भटका समाज महाविकास आघाडी सरकारला मोठा धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. तरी मा न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन भटक्यांचे आरक्षण पुर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात यावे. अन्यथा या विरोधात भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या परिणामास शासन जबाबदार असेल वरील विषयी तात्काळ भटक्या समाजावरील अन्याय दूर व्हावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत जाधव, विजय गोपाल, लक्ष्मण गोपाल, राधेश्याम भोई, भरत राठोड, जितेंद्र जाधव, विशाल धनगर, आनंदा तिरमले, रोहिदास गोपाल, अशोक चव्हाण, आकाश बंजारा, किशोर राठोड, विलास चव्हाण, ओंकार पवार, विजय चव्हाण, शिवानंद बंजारा आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने