नापास बनले बाॅस व्यावसायिक पात्रता नसतानाही पदोन्नती



रत्नागिरी  : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्हता परिक्षेत नापास झालेल्यांना पदोन्नती दिल्याची चौकशी करा व शैक्षणिक व व्यावसायिक  अर्हता प्राप्त नसलेल्यांना सेवेतून कमी करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे.सदर प्रकरणाचे निवेदन  उप अभियंता जिल्हा परिषद उपविभाग कार्यालय दापोली यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना पाठविण्यात आले आहे. 


                निवेदनात म्हटले आहे की,कार्यकारी  अभियंता बांधकाम विभाग चिपळूण जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या दिनांक 3 /11/2008 रोजीच्या पत्रान्वये उप अभियंता ,बांधकाम उपविभाग रत्नागिरी,चिपळूण,देवरूख ,खेड,गुहागर इत्यादींना माहे ऑगस्ट 2008 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्हता परिक्षेचा निकाल संबंधितांना निदर्शनास आणण्यासाठी पाठविण्यात आला आहे. या निकालात अनेक उमेदवार नापास झालेले आहेत. काहींना 100 पैकी 0 गुण तर काहींना 100 पैकी 3 गुण प्राप्त झाले आहेत. नापास झालेल्या उमेदवारांत बी.आर.निमकर बांधकाम उपविभाग चिपळूण,व्ही.एन.पंड्ये बांधकाम उपविभाग राजापूर,व्ही.एस.पिलनकर बांधकाम उपविभाग रत्नागिरी,व्ही. के.कल्याणकर बांधकाम उपविभाग रत्नागिरी,आर.बी.शिवगण बांधकाम उपविभाग खेड,एस.डी.राऊत बांधकाम उपविभाग रत्नागिरी,एस.व्ही. घडशी बांधकाम उपविभाग लांजा,पी.डी.रेमजे बांधकाम उपविभाग मंडणगड,एन.के.पावसकर बांधकाम उपविभाग रत्नागिरी,एस.बी.सुतार बांधकाम उपविभाग खेड,चंद्रकांत गोविंद साळवी,बांधकाम उपविभाग रत्नागिरी,राजन आत्माराम देसाई बांधकाम उपविभाग लांजा,सुनिल शंकर रेवाळे बांधकाम उपविभाग देवरूख,आनंदा निवृत्ती व्हटाळे बांधकाम उपविभाग दापोली,संजय रामचंद्र सुर्वे बांधकाम उपविभाग देवरूख इत्यादींचा समावेश आहे.या नापास उमेदवारांपैकी काही उमेदवारांना व्यवसायिक परीक्षा सुट दाखवून  पदोन्नती देण्यात आली आहे. काहींची शैक्षणिक अर्हता फक्त दहावी पास आहे.त्यांनी व्यावसायिक अर्हता अद्याप प्राप्त केलेली नाही. तरीसुद्धा त्यांना कोणत्या शासननिर्णयाआधारे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसतानाही  पदोन्नती देण्यात आली आहे? याचे मार्गदर्शन मिळावे.कारण परिक्षेत 100 पैकी 0 गुण व 3 गुण मिळालेल्या उमेदवारांना पदोन्नती दिली जाते. ही बाब कुठेतरी न पटण्यासारखी व शंकास्पद आहे.


              2 दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दापोली यांच्या कडून 14 व्या वित्त आयोगातून कुडावळे आदिवासीवाडी स्मशानभूमीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण केलेला रस्ता चोरीला गेल्याची धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.रस्त्याचे काम झाल्याचे खोटी पाटी लावून भ्रष्टाचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.सदर प्रकरणामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागावर लोकांचा विश्वास कमी होत आहे व विभाग  बदनाम होत आहे. हे प्रकरण ताजे असताना याच विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची  शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसतानाही पदोन्नती देण्यात आली व काही उमेदवारांना परीक्षेत 100 पैकी 0 गुण मिळाले. ही लाजीरवाणी बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारकांनाच पदोन्नती देण्यात यावे व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसलेल्यांना सेवेतून कमी करावे.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने