शहादा (प्रतिनिधी) :- नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची दि.६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात शहादा तालुक्याच्या पूर्वेकडील भागात काँग्रेसचे वारे पुन्हा वाहू लागल्याचे दिसत आहे. पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत मंदाणे व खेडदिगर या दोन्ही गणांनी दमदार विजय मिळवीत काँग्रेसने पुन्हा भाजपला धक्का दिला आहे. शहादा तालुक्यातील पूर्वेकडील जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाताला सात दिली असल्याने मंदाणे व खेडदिगर गणातील दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. मंदाणे गणातून काँग्रेसच्या रोहिणी दिनेश पवार तर खेडदिगर गणातून संगीता शांतीलाल पाटील या मोठ्या मतांनी विजयी झाल्यात. पोटनिवडणुकीत काँग्रेसने मंदाणे आणि खेडदिगर गणातील या दोन्ही जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. याआधी दोन्ही गणाच्या जागा भाजपाकडे होत्या. पूर्व भागात पंचायत समितीच्या मंदाणे व खेडदिगर गणात पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की मंदाणे गणात काँग्रेस पक्षाकडून रोहिणी दिनेश पवार, भाजपच्या हेमांगी प्रमोद ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पतीबाई रामदास वाघ, अपक्ष कुसुमबाई चुणीलाल जाधव यांनी उमेदवारी केली होती. तर खेडदिगर गणात काँग्रेसकडून संगीता शांतीलाल पाटील, भाजपाच्या विद्या विजय चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमिला अनिल चव्हाण यांनी उमेदवारी केली होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. परंतु मंदाणे, सुलतानपुर आणि खेडदिगर गण काँग्रेसचा गड असल्याचे सिध्द झाले. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी, माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखविल्याच्या प्रतिक्रीया उमेदवारांकडून देण्यात आल्या.
■ पूर्व भागातील उपसभापती असावा अशी जनतेची मागणी---
शहादा पंचायत समितीत काँग्रेसच्या पोटनिवडणुकीत जास्त जागा आल्याने सत्ता बदल होऊन काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असून शहादा तालुक्यातील पूर्व भागाचा विकासासाठी पूर्व भागातील जनतेचे उपसभापती हा पूर्व भागातूनच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
■कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष:- मंदाणे व खेडदिगर या दोन्ही गणात दोन्ही जागेवर काँग्रेसचे वर्चस्व आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत ढोल ताश्याच्या आवाजात कार्यकर्ते,मतदाता व बालकांसह,महिलां कार्यकर्त्यानी देखील नृत्य केले.
Tags
news

