धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 49 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला असून 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत परिपूर्ण अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
धुळे 23, साक्री 8, शिरपूर व शिंदखेडा प्रत्येकी नऊ अशा एकूण 49 नवीन रास्त भाव दुकानांचा जाहिरनामा महानगरपालिका, संबंधित प्रभाग, गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, तालुका सूचना फलकावर तसेच गाव दंवडी देऊन प्रसिध्द केला आहे. नवीन रास्त भाव दुकानांचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या www.dhule.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रसिध्द केला आहे.
रिक्त स्वस्त धान्य दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : धुळे शहर व तालुका :- धुळे शहर व तालुका- 2, 8, 19, 26, 39, 43, 44, 53, 55, 60, 75. वलवाडी- 3, सावळदे- 7. बोरीस- 49. दह्याणे- 79. आर्वी- 90. मोरशेवडी- 130. जुन्नेर- 137. लोहगड- 150. सुट्रेपाडा- 171. लोणकुटे- 174. नावरी- 193. हेंकळवाडी- 204.
साक्री तालुका : नागझिरी- 91. मालनगाव- 130. कालटेक- 89. कळंभीर- 62. धंगाई- 199. लखाळे- 227. विहीरपाडा- 192. वाकी (नवनिर्मित)- 303. शिरपूर तालुका: शिरपूर- 5, 9, बोराडी- 160. मांडळ- 93. थाळनेर- 106. बोरमळी- 205. भोरटेक- 32. भोईटी- 177. तिखबर्डीपाडा (नवनिर्मित)- 207. शिंदखेडा तालुका: सतारे- 65. कुमरेज- 182. टेंभलाय- 183. वरझडी- 114. सोनशेलू- 123. भिलाणे दिगर- 170. अंजदे बु.- 50. हातनूर- 11. चिमठाणे- 166.
रास्त भाव दुकान ज्या गटास चालविण्यासाठी घ्यावयाचे असेल त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयाकडून दहा रुपये अर्ज शुल्क भरून प्राप्त करुन घ्यावेत. सदर अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या कार्यालयात समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने 26 नोव्हेंबर 2021 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत सीलबंद पाकिटामध्ये सादर करावेत. 26 नोव्हेंबर 2021 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
नवीन स्वस्त धान्य दुकानांचा कालबध्द कार्यक्रम असा : नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करण्याकरीता जाहिरनामा प्रसिध्द करणे- 27 ऑक्टोबर 2021, संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत- 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत. नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे- 27 डिसेंबर 2021 पर्यंत. नवीन दुकान मंजूर करणे- 11 जानेवारी 2022 पर्यंत.
Tags
news




