थाळनेर (प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तीन लहान बालके डेंग्यूसदृश आजाराने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की थाळनेर येथील यश रमेश वाडीले (१३), हिमांशू शशिकांत बागले(१३) ,निधी संदीप पाटील(१०) हे शिरपूर येथे खाजगी दवाखान्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून उपचार घेत आहे. त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निसर्गाच्या वातावरणातील बदलामुळे गावात विविध वायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय दवाखानासह खाजगी दवाखान्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वायरल आजारामुळे रुग्णास ताप चढ-उतार होणे, मळमळ होणे ,पांढऱ्या पेशीची संख्या कमी-जास्त होणे असे विविध लक्षणे दिसून येतात.गावात काही घरातील सर्व लहान-मोठे वायरल आजाराने त्रस्त आहेत. ग्रामपंचायतीने पावसाळ्यात गावात फवारणी करणे गरजेचे होते. यावर्षी अशी कुठली फवारणी गावात झालेली नाही. तसेच गावातील गटारांची साफसफाई नियमित केली जात नाही . त्यामुळे डासांचे व इतर किडींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गावात डासांच्या भीतीमुळे नागरिक घराच्या बाहेर बसण्यास सुद्धा घाबरत आहेत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. सरपंच व ग्राम विकास अधिकारी बाहेर गावाला राहतात त्यामुळे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहेत. नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ग्रामपंचायतीने गावात सर्वत्र फवारणी करणे आवश्यक आहै.
Tags
news
