तरडी शिरपूर येथे बायो सीएनजी प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ




शिरपूर प्रतिनिधी : हत्ती गवतापासून सीएनजी निर्मिती प्रकल्पाचे तालुक्यातील तरडी या गावी भूमिपूजन करण्यात आले. भारत सरकार द्वारे संपूर्ण देशात एमसीएल MCL - मिरा क्लीनफ्युअल लिमिटेड या मुख्य कंपनी मार्फत प्रत्येक तालुक्यात CNG प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शिरपुर तालुक्यात तरडी या गावी MCL कंपनीच्या सहकार्याने सिंधुबाई क्लीनफ्युअल प्रा लि व  सिंधुबाई शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन संचालक श्री राजेंद्र रामदास पाटील व सौ विजया राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते व होळनांथे जि प सदस्य संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

10 एकर जागेत ही कंपनी उभारली जात आहे ज्यात Bio CNG, Bio PNG व सेंद्रिय खत उत्पादन केले जाणार आहे. सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडरचे भाव देखील गगनाला भिडले आहेत व दिवसेंदिवस इंधनाच्या किमती मध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. या वाढत्या महागाईला आळा बसावा म्हणून भारत सरकारने पर्यायी इंधन म्हणून प्रत्येक तालुक्यात बायो सीएनजी प्रकल्प, बायो पीएनजी प्रकल्प, तसेच सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थानिक क्षेत्रावर रोजगार निर्मिती होणार आहे. 

येत्या काळात या प्रकल्पामूळे शिरपूर तालुक्यात २००० कुशल अकुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या तालुक्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पात हत्ती गवतापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे. हत्ती गवताला गिनिगोल, नेपिअर गवत देखील संबोधले जाते. आतापर्यंत शेतकरी या गवताचा उपयोग चारा म्हणून करत होते. मात्र या गवतापासून आता सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती होणार असून प्रत्येक तालुक्यात याचे मुख्य ऑफिस असणार आहे व गावागावात डीलर नेमले जाणार आहेत.

हत्ती गवत (गिनिगोल) साधारण दोन महिन्यात १५ ते २० फुटांपर्यंत वाढते तीन महिन्यात एकदा कापणी केली तरी साधारणपणे वर्षातून चार वेळा कापणी होणार आहे. एक एकर मध्ये किमान १५० ते २०० टन उत्पादन शेतकऱ्याला यातून मिळणार आहे. या गवताला प्रती टन भाव हा एक हजार रुपये असणार आहे. विशेष म्हणजे सदर गवताचे वजन हे स्वतःच्या गावातच होणार असून वजनामध्ये होणाऱ्या नफेखोरीला देखील चाप बसणार आहे. तसेच उत्पादित माल गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर आठवड्या भराच्या आत पैसे जमा होणार आहेत.

हत्ती गवताच्या लागवडीसाठी शिरपूर तालुक्यातून 50 गाव निवडली गेली होती. प्रत्येक गावातून 200 सभासद या प्रमाणे 10 हजार सभासदांची नोंदणी करण्यात आली आहे. 

पायाभरणी शुभारंभ प्रसंगी सिंधुबाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील, से नि कृषि उपसंचालक डी यु बोरसे, से नि कृषी अधिकारी बी डी देसले, संजयकुमार सोनवणे, निलेश देसले सर, प्रा.राकेश चौधरी, सुहास पाटील, बोरगाव जातोडा डी.एच.आर. ग्राम संकलन केंद्राचे प्रमुख बी. डी. सिसोदिया सर, वाठोडा पोलीस पाटील जितेंद्र चौधरी, तरडी सरपंच विद्याताई पाटील, ताजपुरी सरपंच हेमंत पाटील, अजंदे सरपंच राजेंद्र पाटील, बोरगाव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, सिंधूबाई फार्मर प्रोडूसर कंपनीचे सर्व एमपीओ, एमव्हीपी व तरडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने