पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे.. भोंगळ कारभार... असून अडचण, नसून खोळंबा! प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

 पुणे : आवश्यक सेवांतील कर्मचारी आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वेतून प्रवासमुभा देण्यात आली असली, 
तरी या मार्गावर सध्या धावत असलेल्या गाडय़ांच्या वेळा बहुतांश प्रवाशांसाठी गैरसोयीच्या आहेत. 
त्यामुळे पुणे-लोणावळा रेल्वेची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशीच झाली आहे. 
रेल्वेच्या गैरसोयीच्या वेळांमुळे प्रवाशांना नाइलाजास्तव रस्ते वाहतुकीचा महागडा आणि त्रासदायक पर्याय स्वीकारावा लागत आहे.
 त्यातून रेल्वे गाडय़ा रिकाम्या धावत असल्याने रेल्वेलाही तोटा होतो आहे. 
निर्बंधांत सूट देण्यात आल्यानंतर आवश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात आली. 
लशीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून प्रवासमुभा देण्यात आली. 
करोनाच्या पूर्वी पुणे-लोणावळा मार्गावर दोन्ही बाजूने ४४ फेऱ्या होत होत्या. 
या सेवेचा लाभ दररोज एक लाखांहून अधिक प्रवाशांकडून घेण्यात येत होता.
 त्यातून रेल्वेलाही मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळत होते. सध्या या मार्गावर दोन्ही बाजूने दहा फेऱ्या करण्यात येत आहेत. 
मात्र, गाडय़ांच्या वेळा अनेक प्रवाशांना गैरसोयीच्या असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
 पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून चिंचवड ते देहूरोड, तळेगाव, वडगाव मावळ, कामशेत आणि लोणावळा या परिसरात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक महत्त्वाची आहे. 
याच परिसरातून पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने