कोविड- 19’ लसीकरणासाठी विशेष अभियान राबवावे! जिल्हाधिकारी जलज शर्मा : जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश

 



धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीकोविड – 19’ लसीकरण मोहीम राबवावी. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आठवडाभरात लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्यासाठीही विशेष अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथाकोविड – 19’ लसीकरणाच्या जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले आहेत.

जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज सकाळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, लसीकरण अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. कोविड लसीकरण सर्व लाभार्थ्यांना देवून त्यांना संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करावा. त्यासाठी अन्य विभागांनी सहकार्य करावे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करला पहिला व दुसरा डोस देण्याची नियमानुसार कार्यवाही करावी. दुसरा डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे. महानगरपालिका आणि तालुकास्तरावर आढावा बैठक घेवून लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती द्यावी. 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. दिव्यांग, गंभीर आजारी रुग्ण आणि गर्भवतींसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन करावे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. औद्योगिक वसाहत, गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र लसीकरण शिबिरांचे नियोजन करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, धर्मगुरूंची मदत घ्यावी. महाविद्यालयीनस्तरावरही शिबिरांचे नियोजन करावे. त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्रांची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.

सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले, गावागावांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सहकार्य करण्यात येईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले, डॉ. मोरे, डॉ. पाटील यांनी लसीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने