-नुकत्याच आलेल्या महापूरामुळे कोल्हापूर,सांगली,रायगड,रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.अशा भागात नंदूरबार जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी मदत करण्याचे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त श्री.सूरज लाड यांनी केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत कोठली ता.शहादा येथील 'युवकमित्र परिवार' या वाचन चळवळ राबविणाऱ्या संस्थेमार्फत पुरात वाहून गेलेल्या व उध्वस्त झालेल्या नऊ वाचनालयांना तब्बल ३००० पुस्तके मोफत भेट देण्यात आली.संस्थेच्या स्वयंसेवकांनी जुनी/नवी पुस्तक संकलन मोहिम राबवित तब्बल ३००० पेक्षा अधिक पुस्तके जमा केली होती.
पुणे शहरात झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ शिवकालीन इतिहास संशोधक,लेखक डॉ. अजित आपटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बुक क्लब चे संस्थापक अविनाश निमसे,स्नेहल निमसे,सद्गुरू सेवा प्रातिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे,सदविचार वाचनालय आसनपोई,रायगड चें अध्यक्ष उत्तम देशमुख,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन हे होते.
युवकमित्र परिवार नंदूरबार ही संस्था दरवर्षी पुणे,मुंबई शहरातील नागरिकांनी वाचून झालेली जुनी पुस्तके संकलित करते व नवनिर्मित,गरजू वाचनालयांना मदत म्हणून भेट देते.या वर्षी सुद्धा संस्थेच्या स्वयंसेवकांनी संकलन मोहीम राबवत तब्बल ३००० पुस्तके जमा केल्याचे युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी सांगितले.उदघाटक अजित आपटे यांनीसुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केले.अविनाश निमसे यांनी वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.आभार सचिन म्हसे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीत्यासाठी रविराज निमसे यांनी सहकार्य केले.