"माणूस मुळातच एक समाजशील प्राणी आहे". एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे "पर्यटन" होय. मग हे पर्यटन आनंददायी कसे करावे ? या पर्यटनाची अमृतमय यशोगाथा उलगडून दाखवली ती म्हणजे डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई आयोजित "प्रेरणादायी सामाजिक पर्यटन आणि करिअर संधी" या कार्यक्रमात. या कार्यक्रमाला "अमृतयात्रा" या पर्यटन संस्थेचे सर्वेसर्वा मा. अनिल काळे सर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले होते.
'अमृतयात्रा' हे स्थळांचं पर्यटन घडवत नाही, हे माणसांचं पर्यटन घडवते. वेगळ्या पाऊल वाटा शोधणारी माणसं व त्यांचे हिमशिखराएवढे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या अमृतयात्रेचा उद्देश.
आनंदवन, हेमलकसा, ताडोबा अभयारण्य या आणि अशा अनेक ठिकाणी पर्यटन करणे सहज सोपे होते ते काळे सरांमुळेच. मा. बाबा आमटे यांचा समर्थ वारसा घेऊन उभे असणारे आनंदवन, हेमलकसा यांसारखे प्रकल्प बघितले की आपण माणूस म्हणून किती खुजे आहोत हे पटते. मग याच आनंदमय पर्यटनाची सुरुवात कशी झाली ? अमृतयात्रा व स्वयंटॉक म्हणजे काय ? या उपक्रमाचे अनुभव, विद्यार्थ्यांना पर्यटन क्षेत्रातील संधी आणि अशा अनेक गोष्टी उलगडल्या त्या या सहजसुंदर मुलाखतीतून.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा तावडे यांनी केले . डॉ.मीनल मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने प्रश्न विचारून वक्त्यांशी सहजसुंदर संवाद साधला.या कार्यक्रमाला प्रिया उपासनी, वैशाली मंडलिक यांची साथ लाभली तर तंत्रस्नेही म्हणून गायत्री मेहेत्रे मॅडम चे विशेष योगदान लाभले. सोहम अकादमीने नेहमीच विविधरंगी शैक्षणिक कार्यक्रमाची मेजवानी दिली आहे
तर पर्यटन विषयावरील हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी डॉ. मीनल मॅडमचे आभार मानले.
या कार्यक्रमाला मा. हेरंब कुलकर्णी सर, मा.गोडबोले सर, मा.अशोक तकटेसर, मा. अशोक आसवले सर यांसारख्या मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या व सरांच्या मधुर वाणीने त्यांच्या अमृतयात्रेच्या निर्मिती प्रवासामधून अनेक अनुभव ,सामाजिक जाणीव अशा अनेकविध गोष्टी समजल्या. त्यांच्या अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे पण त्यातील काही आठवणी त्यांनी आज उलगडल्या व पर्यटनातून रोजगार संधी कशा उपलब्ध होतात हेही सांगितले. आभार प्रदर्शनाने व एका वेगळ्या ऊर्जेने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags
news
