९ मे - क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती
!! प्राण गेला तरी बेहत्तर
पण शत्रुपुढे झुकणार नाही !!
मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह सिसोदिया म्हणजे विरता,त्याग, धैर्य,बलिदान,चारित्र्य शिलता,राष्ट्रभक्ती,देशाभिमान यांचे मूर्तिमंत प्रतिक होय.बाप्पा रावल, राणा खुमानसिंह, समरसिंह, राणासंग, राणाकुंभ,उदय सिंह यांचा वैभवशाली व शौर्याचा वारसा महाराणा प्रताप यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवापलीकडे जपला.म्हणूनच ते *क्रांतीसुर्य* म्हणवले गेले.मेवाड व चितोड अर्थातच अखंड राजपुताना अकबर बादशहाच्या साम्राज्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी आपलं सारं जीवन पणाला लावलं.अकबर बादशहाच्या तुलनेने सैन्य बळ आणि युद्धसामग्री कमी असूनही त्यांनी सन १५७६ ते १५८६ या दशकात अकबर बादशहाच्या मोगल सैन्याशी प्राणपणाने लढत हळदीघाट व खमनौरच्या युद्धांत अकबर बादशाह अन् त्याच्या सैन्याला जेरीस आणत त्यांना रणांगणातून माघार घेण्यास भाग पाडले.
प्राचीन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या हळदीघाटाच्या युद्धात अकबर बादशहाला राणा प्रतापांच्या पराक्रमाची पूर्ण कल्पना असल्यामुळे नंतरच्या काळात अकबरने महाराणा प्रतापांना जिवंत पकडण्याचा नादच सोडला. युद्धादरम्यान राणा प्रताप यांच्यावर पाठीमागून वार करणाऱ्या मोगल सरदारवर त्यांनी मोठ्या त्वेषाने प्रतिहल्ला करत आपल्या धारदार तलवारीच्या एकाच घावात त्या सरदाराचे आणि त्याच्या घोड्याचे मुंडके क्षणातच धडापासून वेगळे केलं.या पार्श्वभूमीवर महाराणा प्रतापांची देहयष्टी आणि प्रबळ शक्तीचा अंदाज बादशहाला चांगल्याप्रकारे आल्याने,त्याने उभ्या आयुष्यात कधीही राणा प्रतापांशी समोरासमोर येऊन युद्ध केलं नाही,तर त्याजागी आपल्या सरदारांनाच पाठविलं.एवढं मोठं भय होतं बादशाहाला राणा प्रतापांच्या शौर्याचे आणि त्यांच्या तलवार व भाल्याचे. मित्रहो,या गोष्टीला इतिहास साक्षीदार आहे.या युद्धात राणा प्रतापचे अंगरक्षक हकीमखां सुर अन् जालौरचा ताजखां या मुस्लिम सरदारांनी,तर चूनावत कृष्ण दास,झाला मानसिंह,झाला बिजा,राणा पुंजा भील,भिमसिंह रावत सांगा,रामदास,भामाशाह, ताराचंद,रामशाह व त्यांचे सूपुत्र शालिवाहन, भगवानसिंह,प्रतापसिंह आदी शूरवीर योद्ध्यांनी मोलाची कामगिरी केली. *प्राण गेला तरी बेहत्तर,पण शत्रूपुढे मान तुकवणार नाही* अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे महापराक्रमी योद्धे,मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा.
शतकानुशतके शौर्याचे प्रतिक मानल्या गेलेल्या महाराणा प्रतापांनी शपथ घेतली होती की,"मी बाप्पा रावल यांचा वंशज...माझ्या मातृभुमीला शत्रूंपासून मुक्त केल्याशिवाय महलात राहणार नाही.सोन्या-चांदीच्या ताटात भोजन करणार नाही.राजमहलातील शयन गृहात झोपणार नाही.तर वृक्षांची छाया हेच माझे महल,गवत हाच माझा बिछाना,तर झाडांची पानं हीच माझी भोजनाची भांडी राहतील".राणा प्रतापांचे व्यक्तिमत्व कोणाच्याही मनात भरण्याजोगे होते.उंच शरीरयष्टी,श्वेत रंग,भारदस्त डोळे,लांब मिश्या,पिळदार भूज अन् निधडी छाती अशी एकूण त्यांची बलदंड प्रकृती होती.युद्धाच्या वेळी त्यांच्या अंगावर चिलखत,भाला, तलवार आदी तत्सम युद्ध साहित्याचे वजन सुमारे 120 किलो असायचे.त्यांच्या विजयश्रीत *चेतक* या त्यांच्या अश्वाचा देखील मोलाचा वाटा होता.त्याची स्वामिनिष्ठा अतुलनीय व अवर्णनीय होती.या मुक्या प्राण्याने संकटप्रसंगी आपल्या धन्याचे रणांगणावर प्राण वाचविले होते.म्हणूनच राणा प्रताप हे चेतकला आपल्या गळ्याचा ताईत मानत असत.एका युद्धात अकबराच्या सैनिकांनी राणा प्रतापांना चोहोबाजूंनी घेरले असता,चेतकने जखमी अवस्थेत असताना देखील ६० फूटांहून अधिक लांब नाल्यावरुन छलांग मारून मोठ्या हिमतीने धन्याचे प्राण वाचविले होते.एका प्राण्याची आपल्या धन्याबद्दलची निष्ठा जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदली गेली.या पार्श्वभूमीवर चेतकचे बलिदान भारतीयांच्या स्मरणात सदैव राहील,हे निश्चित.कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी जारोळ येथे *चेतका का चबुतरा* हे स्मृतीस्मारक उभारले आहे.वास्तविक पहाता,चेतकची स्वामीनिष्ठा ही खऱ्या अर्थानं मानसिंग सारख्या गद्दारांना धडा शिकवून गेली,याची इतिहास कारांनी नोंद घेतल्याने चेतकच्या स्तुत्य कामगिरीला आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला.महाराणा प्रताप यांनी तर एक फर्मान काढला होता की,"बाप्पा रावल यांच्या वंशजातल्या कुठ्ल्याही सदस्याने गद्दार मानसिंगसोबत भोजनाच्या पंगतीत बसू नये". खरं तर,मानसिंग यांना अकबर बादशाहाचे मांडलिकत्व स्वीकारल्याची ही शिक्षा होती.तात्पर्य,महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेसह चेतकची स्वामिनिष्ठाही मोठ्या दिमाखात अन् आदराने भारतभूमीवर सदासर्वकाळ चर्चिली जाईल,हे निश्चित.
प्रभू रामचंद्रांनी आपल्या चौदा वर्षांच्या वनवासात कंदमुळे खात आपल्या पत्नी व भावासह रानावनात दिवस काढले.त्या बिकट प्रसंगी त्यांना आदिवासी-वनवासींचे मोठे सहकार्य लाभले.प्रभू रामचंद्र अन् त्यांच्या कुटुंबियांना वनवासींनी कुठलीही कमतरता भासू दिली नाही.असेच सहकार्य महाराणा प्रताप अन् त्यांच्या कुटुंबियांना भिल्ल समाजाच्या लढवैये बांधवांकडून प्राप्त झाले. हळदीघाटाच्या युद्धाच्या वेळी दऱ्या खोऱ्यातून,पहाडी,घाट,डोंगर कपाऱ्यातून आपल्या धनुर्विद्याच्या युद्धकौशल्याचा वापर करत, महाराणा प्रताप यांना मोठी मोलाची साथ देऊन अकबर बादशहाच्या बलाढ्य सैन्यदलाची दाणादाण उडविली.मोगल सैनिकांना पहाडी, डोंगर घाटात युद्ध करण्याचे तंत्र अवगत नव्हते.त्यामुळे मोगलांचे सैन्यदल अखेर हतबल होऊन रिकाम्या हाती आपल्या राज्यात परतले.राणा प्रतापला जिवंत पकडण्याच अन् त्यांना पराभूत करण्याचं अकबराचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. दरम्यान राणा प्रतापांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या मेवाडच्या राजचिन्हावर एका बाजूला राजपूत योद्धा तर दुसऱ्या बाजूला भिल्ल लढवैयाची प्रतिमा कोरली आहे.प्रभू रामचंद्र अन् महाराणा प्रताप यांना भिल्ल समाजाने संकटसमयी जी मोलाची मदत केली,तिला इतिहासात तोड नाही.परिणामी आजही राजपूत समाजात भिल्ल जमातीच्या लोकांना मानपानाने वागविले जाते.
हिंदुत्वाची भगवी पताका सर्वदूर फडकवत मातृभूमीचे तन- मन-धनाने रक्षण करण्याचा विडा उचलणारे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात मोठे साम्य होते. दोन्ही महायोद्ध्यांनी जातीपातीवर विश्वास न ठेवता,निष्ठा व युद्धप्राविण्य यास प्राधान्य दिलं.तसेच धर्मद्वेष न करता आपल्या सैन्यदलात सर्व जातीधर्मातील लोकांना स्थान दिले.दोन्ही योद्धयांचे अंगरक्षक मुस्लिम होते.थोडक्यात हे दोघे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.वेळप्रसंगी दोन्ही योद्धयांनी युद्ध करतेप्रसंगी *गमिनी कावा* या युद्धतंत्राचा वापर केला.राणा प्रताप आणि शिव छत्रपती यांना परस्रीबद्दल नितांत आदर होता.राणा प्रतापांनी मिर्झा खानच्या पत्नीला माते समान वागणूक देऊन त्यांच्या राज्यात आदराने पोहोचविले,तर शिव छत्रपतीं नी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने वागणूक देऊन तिला तिच्या राज्यात आदराने परत पाठविले.महत्वाचे म्हणजे या दोन्ही राष्ट्रपुरुषांनी मोगल बादशहांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता,त्यांचे मांडलिकत्व वा शरणागती पत्करली नाही.जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ताट मानेनं जगले अन् आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून तिचं पावित्र्य अबाधित ठेवलं.या दोन्ही हिंदुत्ववादी महायोद्ध्यांना त्रिवार मानाचा मुजरा.
थोर इतिहासकार गौरीशंकर ओझा म्हणतात," जोपर्यंत विश्वात वीरांची पूजा होत राहील,तोपर्यंत महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची गाथा लोकांच्या सदैव स्मरणात राहून प्रेरणा देत राहील".राणा प्रतापांनी शौर्य अन् देशाभिमानाने एका वैभवशाली इतिहासाची निर्मिती केली.महाराणा प्रताप म्हणत," पारतंत्र्याच्या साखरभातपेक्षा मला माझ्या स्वातंत्र्याची मीठभाकरी व कंदमुळे प्रिय आहेत". माजी पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू आपल्या *भारताचा शोध* या ग्रंथात गौरवपूर्ण शब्दांत म्हणतात,"राणा प्रताप हे संकटाचे स्वागत करणारे योद्धे़ होते.अत: जोपर्यंत पृथ्वीवर वीरांची पूजा होत राहील,तोपर्यंत राणा प्रतापांची आठवण लोकांना राष्ट्रप्रेम आणि देशाभिमानाचे धडे देत राहील".
दरम्यान अकबर बादशाहाला जेव्हा राणा प्रतापांच्या दुःखद निधनाची खबर कानी पडली,तेव्हा ते सिंहासनाव रून ताडकन उठून काही काळ स्तब्ध उभे राहिले.बादशाहाच्या डोळ्यात क्षणात पाणी आले.ते म्हणाले," मेवाडचा राजा महाराणा प्रताप हा *अपराजित राजा* होता.तो आयुष्यात कोणापुढे झुकला नाही.म्हणून मी त्याला सलाम करतो".ज्याच्या शौर्य गाथेची शत्रूदेखील गोडवे गातात,अशा क्रांतीसूर्य महाराणा प्रतापांना ४८१ व्या जयंतीनिमित्त मी मानवंदना देतो.जय राजपुताना !
प्रिय संपादक महोदय,कृपया आपल्या लोकप्रिय मराठी दैनिकात सदर लेख दि.९ मे च्या अंकात प्रसिद्ध करावा, ही विनंती.
*लेखक - रणवीर राजपूत*
सदस्य,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,ठाणे.
मो.न.९९२०६७४२१९
Tags
news