राज्यातल्या दहावीच्या परीक्षा तूर्त तरी रद्द नाहीत: शिक्षणमंत्री गायकवाड यांची माहिती..


मुंबई:
_केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने (CBSE) बोर्डाने इयत्ता दहावीची यंदाची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्यातील दहावीची परीक्षाही रद्द होणार का अशी चर्चा होती. मात्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा तूर्त तरी विचार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.दरम्यान, राज्यातील शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य सरकारने तूर्त लांबणीवर टाकल्या आहेत. अलीकडेच याबाबतची घोषणा गायकवाड यांनी केली होती._

_सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षांबाबत सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही निर्णय किंवा तशी चर्चा नसल्याचे गायकवाड यांनी एक वृत्तवाहिनीला सांगितले. करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. तूर्त तरी परीक्षा रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव वा विचार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे._

_महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत._

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने