कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत जनजागृती करावी! धुळ्यात आढावा बैठक : पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश




धुळे, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घेत उपचार सुरु करावेत. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी. त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी ‘कोविड- 19’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले,  वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, धुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या माहितीसाठी खासगी रुग्णालयांनी दर फलक लावले पाहिजेत. तेथे एक कर्मचारी नियुक्त करावा. अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी करावी. जास्तीचे बिल आकारल्यास  बिलांची पडताळणी करावी. रेमडेसिव्हिर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच त्यांचा आवश्यकतेनुसार वापर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. याशिवाय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेश्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून ते 24 तास सुरू राहील. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्या असून पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, हिलाल माळी, श्याम सनेर यांनी आपले म्हणणे मांडले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने