धुळे, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) : दोंडाईचासह परिसरातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार वापर करावा, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत आज दुपारी दोंडाईचा येथे कायदा व सुव्यवस्था व ‘कोविड -19’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक नगरपालिकेच्या सहकार महर्षि दादासाहेब रावल सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, की दोंडाईचा येथे कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात सर्व औषधे, इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून आवश्यकता भासल्यास आणखी औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. उपविभागीय अधिकारी, शिरपूर यांनी आरोग्य यंत्रणेचा नियमितपणे आढावा घ्यावा. दोंडाईचा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आमदार श्री. रावल म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. दोंडाईचा येथील रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. औषधे, यंत्रसामग्री उपलब्ध आहे. निधीची कमतरता नाही. मात्र, नागरिकांनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच तपासणी करून औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी नारायण पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रे यांनी शिंदखेडा तालुका व दोंडाईचा शहरातील कोविड – 19 रुग्णांबाबतची माहिती दिली.
Tags
news
