शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना कोव्हीड १९ चे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे ठरले आहे. शहादा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गला हद्दपार करण्याची ताकद कोरोना प्रतिबंधक लसीकरणातूनच शक्य आहे.
लसीकरणाकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे . संसर्गाची शक्यता लसीकरणामुळे अतिशय कमी होते , तसेच सहआजार असलेल्या रुग्णांनाही लसीकरणामुळे संरक्षण मिळते . वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवरचे फायदे लसीकरणामुळे साध्य होणार आहे . लस घेतल्यांतरही संसर्ग झाला , तर तो तीव्र स्वरूपाचा असणार नाही . लसीकरणातील दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल , विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा फैलाव कमी होईल . त्याला पुढे जाण्यासाठी वाट मिळणार नाही . संसर्गाची जी साखळी आहे ती तोडण्यासाठीही मदत होईल . त्यामुळे अधिकाधिक लोक लसीकरण करतील , तेव्हा हर्ड इम्युनिटी तयार होईल . वाघर्डे येथील आरोग्य केंद्रात भोरटेक, चिखली खुर्दे, नवानगर, जावदे त.ह., जाम, ओझर्टा, दामळदा, गोगापुर, कुरंगी, सोनवल, कवळीथ, आसुस, टूकी, वाघर्डे या गावांतील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. निकम यांनी केले.
Tags
news
