शिरपूर : एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निलाक्षी जगदीश गिरासे हिची राज्यस्तरीय बालवैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड झाली असून तिचे कौतुक केले जात आहे.
राज्यस्तरीय ऑनलाईन राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा दि. 31/01/2021 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून 22 जिल्ह्यातून 115 प्रकल्प सादर करण्यात आले. या राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत विद्यालयाची इ. नववीची विद्यार्थिनी गिरासे निलाक्षी जगदीश हीने "शिरपूर शहरातील बदलत्या तापमानाचा अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना सुचवणे" हा संशोधन प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिल्या 30 प्रकल्पांमध्ये निवड झाली असून तिला या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य आर. बी. पाटील, पर्यवेक्षक जे. पी. पाटील यांनी कौतुक केले.
संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अटल इन्चार्ज बी. एस. महाजन, सर्व विज्ञान व गणित शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
