बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी! : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधक समितीची बैठक




धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. कारवाई करणाऱ्या पथकांना पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा. तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक नियमितपणे घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, समितीचे सदस्य सचिव तथा पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी (गृह), श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय बच्छाव, अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲङ चंद्रकांत येशीराव आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येवू शकतो. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुध्द तातडीने कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलिस दलाची मदत घ्यावी. तसेच संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करावेत. यापूर्वी गुन्हा दाखल होवूनही पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कठोर कारवाई करावी. याशिवाय अशा वैद्यकीय व्यावसायिकांची यादी प्रकाशित करावी. महानगरपालिकेनेही आपल्या कार्यक्षेत्रातील अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी.
नागरिकांनी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधातील तक्रार नोंदवावी. तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाईस टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आयुक्त श्री. शेख, डॉ. सूर्यवंशी, ॲङ येशीराव, डॉ. मोरे यांनी भाग घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने