धुळे : धुळे येथील श्री विलेपार्ले केळवानी मंडळ संचलित एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूल मध्ये दोन दिवसीय ‘एडूफेस्ट २०२१’ अंतर्गत चित्रकला व विज्ञान प्रदर्शन "इ-स्टीम" या प्रदर्शनाच्या थीमवर आधारित भरविण्यात आले. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एस.व्ही.के.एम. धुळे कॅम्पसचे सल्लागार व माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी एस.व्ही.के.एम. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, एन.एम.आय.एम.एस. स्कूल ऑफ
कॉमर्स चे कुणाल पसारी, पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रेखिल श्यामसुखा, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रकला प्रदर्शनात इयत्ता प्री-प्रायमरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते. प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवल्या. या प्रदर्शनाची वैशिष्टपूर्ण बाब म्हणजे इ. ७, ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी कँनवासवर ऍक्रेलिक कलर याद्वारे विविध विषयांवर चित्रे रेखाटली तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनीही वॉटर कलर पेंटीग, पोस्टर कलर पेंटींग, पेंसिल शेडिंग, कागद काम ओरिगामी, वर्तमान पत्रापासून बाहुली बनविणे, 3 डी व 2 डी मॉडेल्स, शुभेच्छा कार्ड, मेणबत्ती बनवणे व सजवणे, विविध प्रकारच्या घरांच्या कलाकृती बनविल्या. या सर्व कलाकृतीचे शाळेचे कलाशिक्षक संजय गलवाडे यांनी ऑनलाईन चित्रकला तासिके दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्र मानवी संवेदना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थी केवळ अभ्यास आणि शिक्षणातच न राहता चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व आपली कला सादर करता यावी हा मुख्य उद्देश या प्रदर्शनाचा आहे. वेगवेगळ्या विषयांच्या या कलाकृतीनी रसिकांची मने वेधून घेतली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट चित्रांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. चित्रकला प्रदर्शनाबरोबर नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी एकूण ३५० प्रतिकृती तयार केल्या.
विज्ञान प्रदर्शनासाठी वर्गवारीनुसार विषय देण्यात आले. इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांनी ‘निसर्ग’ या विषयाद्वारे वन्यजीव आणि वनस्पती आणि नैसर्गिक वस्ती आणि परिसंस्था यांचे संरक्षण मानवाने कसे करावे हे बालवैज्ञानिकांनी बनविलेल्या प्रतिकृतीतून स्पष्ट केले. विशेष आकर्षण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांने जंक फूड व हेल्दी फूड या विषयावर आधारित कोडींग प्रोजेक्ट बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘चिल्ड्रन अराउंड द वल्ड' या विषयावर विविध देशातील उदा. भारत, चीन, फ्रान्स, न्यूझीलंड, केनिया,सौदी अरेबिया, यूएसए, ब्राझील या देशांच्या प्रतिकृती तयार करून व चार्टच्या माध्यामातून तेथील खाद्य संस्कृती, वेशभूषा, प्रसिद्ध ठिकाणे, सण उत्सव कशा पद्धतीने साजरे करण्यात येतात हे दाखवले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा व आपल्या देशाबरोबर जगभरातील देशांच्या संस्कृतीचे दर्शन घडावे हा मुख्य उद्देश होता. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘फूड’ या विषयाद्वारे निरोगी जीवनाचा एक मार्ग म्हणजे चांगले पोषण मानवी शरीराला निरनिराळ्या प्रकारच्या पोषणद्रव्याची आवश्यकता असते विद्यार्थ्यांनी विविध व्यंजनाचे महत्त्व आपल्या प्रकल्पाच्या माध्यामातून सादर केल्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्ष्यांचे घरटे’ या विषयातून जगभरातील विविध पक्ष्यांच्या जाती व पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व हे घरटयांच्या प्रतिकृती बनवून सादर केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘अराउंड द वल्ड’ या विषयाच्या माध्यमातून जगभरातील विविध ऐतिहासिक स्मारकांच्या वास्तू प्रतिकृती तयार करून त्यामागील ऐतिहासिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. इयत्ता सहावी, सातवीच्या आठवीच्या व नववीच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धन, जलचक्र, वातावरण तंत्रज्ञान या विषयांच्या माध्यमातून निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा विज्ञानाशी कसा संबंध आहे हे प्रयोगातून दाखवून दिले. सर्व विज्ञान व चित्रकला प्रकल्पाचे परीक्षण एस.व्ही.के.एम. आय.ओ.पी. व आय.ओ.टी. विभागाच्या प्रा. डॉ.आरती बी., रुबी मंडल, मिस विजयलक्ष्मी, सुमित राठोड यांनी केले.
यंदाच्या कोरोना वातावरणामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते ऑनलाईन माध्यामातून सुरु आहे. परंतू या उपक्रमामुळे पुन्हा एकदा विद्यार्थी प्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या शाळेशी पुन्हा जोडले गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन यांनी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले व खूप कौतुकही केले. सदैव पालकांचे शाळेप्रती आदर व प्रेमभाव राहो अशी आशा व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन व विज्ञान शिक्षिका सना देशमुख, कलाशिक्षक संजय गलवाडे, सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. जयलक्ष्मी जी. यांनी सूत्रसंचालन केले.
Tags
news
