आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. लिना पाटील यांना क. ब. चौ. उमवि तर्फे पीएच. डी., उत्तर महाराष्ट्रातील कापूस पिकावर नाविन्यपूर्ण संशोधन




शिरपूर : येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा. लिना पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील जैवतंत्रज्ञान विषयातून नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

"स्टडीज ऑन एक्स्ट्रासेल्ल्युलर हायड्रोलाईटीक एन्झाईम्स प्रोडयुस्ड बाय फायटोपॅथोजेनीक फंजाय ऑफ गॉस्सीपीअम स्पेसीस" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. प्रा. लिना पाटील यांना संशोधनासाठी शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उल्हास पाटील यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.

प्रा. लिना पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील कापसाच्या पीकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या बुरशीजन्य आजारांवर जागतिक स्तराचे संशोधन केले. त्यांनी जागतिक स्तरावर कापसाच्या पीकावर प्रादुर्भाव करणाऱ्या दोन बुरशी प्रथमच शोधून काढल्या. याच बुरशींमुळे उत्तर महाराष्ट्रातील कापसाचे उत्पन्न घटत असल्याचेही त्यांनी आपल्या संशोधनात सिद्ध केले आहे. त्याचबरोबर ह्या बुरशीचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी त्यांनी जैवनियंत्रक जिवाणूही शोधून काढला आहे. प्रा. लिना पाटील यांचे शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांत प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. प्रा. लिना पाटील हे मागील १० वर्षांपासून महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. ते शिरपूर तालुक्यातीलच विखरण गावाचे रहिवासी असून एका सामान्य शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत. 

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. जाधव, उपप्राचार्य डॉ. ए.एम. पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. रवींद्र पाटील यांनी कौतुक केले.
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने