धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात आजपासून कोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात झाली. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रथम लस टोचून घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, कापडणे, ता. जि. धुळे येथील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांना लस देण्यात आली.
कोविड 19 लसीकरण मोहीम जिल्हा रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, ग्रामीण रुग्णालय, साक्री व प्रभातनगर- धुळे शहर, असे 4 शीतसाखळी केंद्रांवर राबविण्यास आजपासून सुरवात झाली. या केंद्रांवर प्रति दिवस 100 लाभार्थी याप्रमाणे एकूण 400 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात एकूण 10 हजार 170 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे 12 हजार 430 डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. यामध्ये धुळे महानगरपालिकेला 5 हजार 250 डोस, उपजिल्हा रुग्णालय शिरपूरला तीन हजार 260 डोस व ग्रामीण रुग्णालय साक्रीला तीन हजार 920 डोस पुरविण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे. लस अत्यंत सुरक्षित आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रथम लस टोचून घेतली आहे. धुळे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचे अत्यंत शिस्तबध्द असे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले म्हणाले, सर्व जणांना लसीची प्रतीक्षा होती. लस प्राप्त झाली आहे. पहिली लस मी स्वत:च टोचून घेतली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नूम पटेल, डॉ. अभय शिनकर, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रवी सोनवणे, डॉ. प्रिया मसणे आदी उपस्थित होते.
Tags
news