सुळे येथे लुपिन फाउंडेशन धुळे व एकात्मिक बाल विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांना विशेष पोषक आहार वितरण




शिरपूर : लुपिन फाउंडेशन धुळे व एकात्मिक बाल विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांना विशेष पोषक आहार वितरण कार्यक्रम सुळे येथे संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीराम पावरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी सचिन शिंदे, लुपिन फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, सुळे गावचे सरपंच शिक्राम पावरा, ग्रामसेवक जी. बी. सोनवणे, रोहिणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. राष्ट्रपाल अहिरे, लुपिन संस्थेचे वरिष्ठ समनव्यक संदीप झनझने, निलेश पवार उपस्थित होते.

प्रतिमापूजन व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकात योगेश राऊत यांनी संस्थेचा या पथदर्शी कार्यक्रमाचा उद्देश, प्रक्रिया तसेच शासनाच्या व संस्थेच्या सहभागाची माहिती दिली. शिरपूर तालुक्यातील रोहिणी बिटच्या एकूण 34 अंगणवाड्या मधील एकूण 282 कुपोषित मुलांची निवड करण्यात आली आहे. त्याची वैयक्तिक आरोग्य तपासणी करून त्यामागील नेमके कारण शोधून त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना विशेष आहार म्हणून दर महिन्याला प्रत्येकी 2.5 किलो नागली बिस्किटे व 1.5 किलो खजूर घरपोच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच निवडक अंगणवाडीना कुंपण करून परसबाग करण्यात येणार आहे व पुढील खरीप हंगामात लोह घटक असणाऱ्या विशेष बाजरीचे बियाणे देण्यात येणार आहे. हे सर्व करत असतांना सर्व निवडलेल्या बालकांचे एक आरोग्य कार्ड तयार करण्यात आले आहे. ज्यात सर्वांची दर महिन्याला वजन उंची व इतर सर्व उपचाराची, मदतीची नोंद करून त्याची प्रगती तपासण्यात येणार आहे.

आपल्या मनोगतात बालविकास अधिकारी यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या पोषण आहार व उपक्रमाची माहिती दिली. तसेच मिळालेल्या आहाराचा बालकांना योग्य प्रकारे द्यावा जेणेकरून त्यांच्या वजन वाढीसाठी उपयोग होईल असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात आमदार काशीराम पावरा यांनी आहाराचे महत्व, बालकांना आहार वेळेत व योग्य प्रकारचा दिला पाहिजे याचे महत्व सांगितले. तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास योजना लोकांपर्यंत सहज फोहोचतील. लुपिन फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात 5 अंगणवाडी च्या बालकांना प्रातिनिधिक स्वरूपात सर्व आहार वितरित करण्यात आला. त्यासाठी रोहिणी बिट च्या सुपरवायझर रंजना पावरा व सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुळे जि.प. शाळेचे शिक्षक प्रदीप खाडे यांनी केले. आभार संदीप झणझणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, लुपिन फाऊंडेशनचे तालुका समन्वयक शैलेंद्र पाटील, संदीप तोरवणे, सुर्यकांत तावडे, कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने