ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापराचे 15 दिवस निश्चित : जिल्हादंडाधिकारी संजय यादव



धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र  सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार विविध तरतुदीनुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराचे वर्षभरातील 15 दिवस जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी निश्चित केले आहेत. 
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे. त्यानुसार ध्वनी प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. 
तसेच अशी सवलत देताना अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी घालण्यात याव्यात. तसेच मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापराबाबतची सवलत 15 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही व सवलत राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात नसल्याने त्याची अंमलबजावणीची करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची परवानगी देताना ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. त्यानुसार 2021 मधील धुळे जिल्ह्यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. 
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत सूट दिलेले दिवस असे : शिवजयंती (1 दिवस), ईद- ए- मिलाद (1 दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1 दिवस), 1 मे महाराष्ट्र दिवस (1 दिवस), गणपती उत्सव (4 दिवस, पाचवा, सातवा, नववा दिवस व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव (2 दिवस, अष्टमी व नवमी), दिवाळी (1 दिवस), ख्रिसमस (1 दिवस), 31 डिसेंबर (1 दिवस). उर्वरीत 2 दिवसांबाबतची परवानगी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणसंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदूषण नियम 2000 चे पालन करण्यात यावे. नियमातील कोणत्याही तरतुदींचा भंग झाल्याचे आढळून आल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये कारवाईस संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी नमूद केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने