औद्योगिक विकासासाठी कृती आराखडा तयार करावा! : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न

 



     धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. वेगवेगळे महामार्ग गेलेले आहेत. कृषी उत्पादन मुबलक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा उद्योग मित्र समितीचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, प्रशिक्षणार्थी महाव्यवस्थापक अमोल इंगळे, खानदेश औद्योगिक विकास परिषदेचे नितीन बंग, खानदेश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव भरत अग्रवाल, धुळेअवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नितीन देवरे, भाजप उद्योग आघाडीचे संजय बागूल, राहुल मुंदडा, उमेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृध्द आहे. मूलभूत सोयीसुविधा मुबलक उपलब्ध आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात उद्योग- व्यवसायाच्या वृध्दीची मोठी संधी आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे. बँकिंग क्षेत्राने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वित्तीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या सर्व प्रयत्नांचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील. शेतकरी, उद्योजकांचे उत्पन्न वाढून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. धुळ्यात उपलब्ध सोयीसुविधांची माहिती उद्योजकांनी अन्य उद्योजकांना द्याव्यात.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योजकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अग्निशमन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा, असेही सांगितले. तसेच रावेर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विस्तारीत क्षेत्रासाठी पाठपुरावा करण्यात येईल. साक्री तालुक्यात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगासाठी औद्योगिक महामंडळासाठी क्षेत्र उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू असून गोंदूर विमानतळाचे सक्षमीकरण, लॉजिस्टिक हबच्या निर्मितीसाठी पडताळणी केली जात आहे, असे सांगत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक नियमितपणे घ्यावी, अशाही सूचना दिल्या.

     यावेळी उद्योजकांनी औद्योगिक वसाहतीत वीज जोडणी तत्काळ मिळावी यासह प्लॉट विक्री, अतिक्रमण, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत श्री. बंग, श्री. अग्रवाल, श्री. बागूल, श्री. देवरे आदींनी भाग घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने