धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा मुंबई मंत्रालय, विधानभवन येथे दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, अनेक आमदार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आमदार अमरिशभाई पटेल यांचा सत्कार केला.
----------
-----------
धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 437 पैकी तब्बल 332 मते मिळवून विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळविला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजयश्री प्राप्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. मंगळवारी दि. 1 डिसेंबर रोजी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर 437 पैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी 99.31 टक्के मतदान झाले होते. गुरुवारी दि. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील राजकारणात विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे आमदार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना 332 मते व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना केवळ 98 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात अष्टपैलू व्यक्तिमत्व, विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात सर्वच पक्षातील दिग्गज नेते व कार्यकर्ते यांच्याशी स्नेह संबंध प्रस्थापित करून सर्वांना विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या विकासकामांच्या अजेंड्यावर सर्व मतदार प्रभावित होऊन मोठ्या मताधिक्याने आमदार अमरिशभाई पटेल यांना निवडून दिले.
Tags
news
