मास्कचा नियमितपणे वापर करावा, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना
धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूची नवी आवृत्ती आढळून आली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने दक्षता बाळगावी. राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमितपणे मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 14 हजार 357 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (22 डिसेंबर 2020) 47 रुग्ण आढळले. सोमवारी (21 डिसेंबर) 20, रविवारी (20 डिसेंबर) 8 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या 231 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्ण वाढीचा दर पाहिला, तर रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यास नागरिकांची बेफिकीरी कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिक घराबाहेर पडताना मास्कचा वापर करताना दिसून येत नाही. बाजारपेठेतही अनेकजण विनामास्क फिरताना दिसतात. एवढेच नव्हे, तर शारीरिक अंतरही ठेवत नाही. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर रुग्ण संख्या ऑगस्ट- सप्टेंबरमधील रुग्ण संख्येपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे धुळे जिल्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात यशस्वी ठरला आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये वाढलेल्या बेफिकीरीमुळे रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आरोग्य यंत्रणा अहोरात्र सेवा बजावत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांची साथ आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार संबंधितांनी तातडीने कार्यवाही सुरू केलेली आहे. तसेच राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या नियमाचेही प्रत्येक नागरिकाने पालन केले पाहिजे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्याच्या तीव्रतेचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ घेत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनीही सतर्कता बाळगत आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. नियमितपणे मास्क वापरावा. हात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, वृध्दांची काळजी घ्यावी. ताप, खोकला असेल, तर नागरिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. सहव्याधी (को-मॉर्बिड) रुग्णांचा औषधोपचार नियमितपणे सुरू राहील याचीही दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.
