धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत, तर धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपरिषदांच्या क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night Curfew) घोषित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
धुळे जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या 21 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन आदेशानुसार 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 20201 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून धुळे जिल्ह्यातील धुळे शहर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित केली आहे. तसेच धुळे शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपरिषद क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच राज्य शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश, अपवाद पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news
