धुळे,
दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक
सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रतिबंधित
क्षेत्र वगळता अन्य भागातील नववी ते
बारावीपर्यंतचे वर्ग 7 डिसेंबर 2020
पासून सुरू करावेत, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव
यांनी दिले आहेत.
धुळे जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू
करण्यासंदर्भात आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयतील सातपुडा सभागृहात आढावा
बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी
जिल्हाधिकारी श्री. यादव
बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे,
महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ.
दीपक शेजवळ, शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे (माध्यमिक),
मनीष पवार (प्राथमिक)
आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. यादव म्हणाले,
नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती, प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षक- पालक संघाच्या संमतीनंतर पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील
शाळा सुरू कराव्यात. शाळा
सुरू करताना कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
वेळोवेळी शाळा खोल्या स्वच्छ कराव्यात.
विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी थर्मल गन,
ऑक्सीमीटर ठेवावेत. शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांनी मुख्यालयीच थांबणे आवश्यक
आहे. ग्रामीण भागातील शाळा
सुरू केल्यावर शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत दुसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात
येईल. कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखत शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या निकषांचे पालन होते किंवा नाही
याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने फिरते पथक तैनात करावे.
परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणारी
वाहने नियमितपणे सॅनेटायझरने स्वच्छ केले जातील याची खबरदारी बाळगावी,
अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री.
यादव यांनी दिल्या.
नववी ते
बारावीपर्यंतच्या वर्गातील जे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत,
असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत.
त्यांच्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण
उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने कृती
आराखडा तयार करून सादर करावा. जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू कराव्यात.
त्याचे नियोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात
येईल. शिक्षणाधिकारी श्री.
बोरसे, श्री. पवार
यांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची
माहिती दिली. यावेळी शिक्षण विभागाचे
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.