आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन
शिरपूर : भरड धान्य (मका, ज्वारी, बाजरी) ची खरेदी पारदर्शीपणे करण्यात यावी, बाजार समितीचे कर्मचारी मदतीला घ्यावे यासह महत्त्वाच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा
आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदनातून दिला आहे.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रकाश भोमा गुजर, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील यांनी दि. ५ नोव्हेंबर गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे जाऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हिताची मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या खरेदी धोरणानुसार नुकतेच शासनाने भरड धान्य खरेदी बाबतचे आदेश काढले आहेत. त्या आदेशानुसार दि. १ नोव्हेंबर २०२० पासून पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु दि. १ नोव्हेंबर रोजी रविवारी एकाच दिवशी पोर्टलवर ३६४ नावांनी नोंदणी झालेली आहे. सदरची नोंदणीत काही नावे बोगस पीक पाहणी लावून, शेतकऱ्यांचे सातबारा उतारे हे काही व्यापाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी नोंदणी केलेले आहेत, असा संशय आहे. सदर नोंदणी ही पैसे घेऊन करण्यात आलेली आहे याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. पोर्टल नोंदणीचे काम खरेदी-विक्री संघाचे सेक्रेटरी दर्शन रघुनाथ देशमुख यांनी केलेली आहे. त्यांना त्वरित पदावरून काढण्यात यावे व नवीन सचिव नेमण्यात यावा. यात ए. आर., मार्केटिंग ऑफिसर, तहसीलदार यांनी संपूर्ण यादी तपासून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने पारदर्शकता आणावी. पोर्टल नोंदणीच्या कामात अडथळा येऊ नये व पारदर्शकता यावी म्हणून नवीन सचिव नियुक्त करावा तसेच त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन कर्मचारी यांना मदतीला घ्यावे. याप्रमाणे खरेदी करण्यात यावी व होणारा काळाबाजार त्वरित थांबवावा. सदर अंमलबजावणी ४८ तासांच्या आत न झाल्यास शिरपूर मार्केट कमिटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण उपोषणास बसेल असे निवेदनात म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, पोर्टल वर नाव नोंदणी सुरु ठेवावी, मका खरेदी थांबवू नये अशीही मागणी करण्यात आली आहे.
Tags
news