जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
व्यापाऱ्यांसमवेत बैठक
धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला,
तरी त्याचा धोका टळलेला नाही. आगामी काळात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पुढील आठवड्यापासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील वर्दळ वाढणार आहे. नागरिकांनी साध्या पध्दतीने दिवाळीचा सण साजरा करीत खबरदारी बाळगावी.
घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरावा. दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर ठेवावे. राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे,
असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
कोरोना विषाणू आणि आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात वरीष्ठ अधिकारी व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित,
महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे,
उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे
(धुळे), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.
यादव म्हणाले,
राज्य शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. त्यामुळे विविध आस्थापना सुरू झाल्या आहेत.
आता दिवाळीचा सण येत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी एकाच वेळेस बाजारपेठेत गर्दी करू नये. दोन व्यक्तींमध्ये पुरेसे शारीरिक अंतर ठेवावे. प्रत्येक नागरिकाने नियमितपणे मास्क वापरावा. त्यासाठी व्यापाऱ्यांनीही दक्षता बाळगत ग्राहकांना मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे.
तसेच एकाच वेळेस दुकानात गर्दी होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील हॉकर्सची महानगरपालिकेने रॅपिड अँटिजेन चाचणी सुरू करावी. ही मोहीम दोन टप्प्यात राबवावी.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिस विभाग, महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या सहकार्याने पथके गठित करावीत. ही पथके शहरात गस्त घालून राज्य शासनाच्या नियमांचे पालन होते आहे किंवा नाही याची पडताळणी करतील.
मास्क न वापरणे, शारीरिक अंतर न ठेवणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करावी.
महानगरपालिकेने कोरोना विषाणूच्या जनजागृतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाने मास्क वापरावा म्हणून जनजागृती करावी.
धुळे जिल्ह्यात दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावाहून नागरिक येतील.
त्यांनीही कोरोना विषाणूबाबत राज्य शासनाचे नियम पाळावेत.
त्यांनीही नियमितपणे मास्क वापरावा. तसेच हात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत.
फटाके विक्री दुकानांच्या परिसरात महानगरपालिकेने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात.
तेथे महानगरपालिकेने अग्निश्यामक दलाचा बंब उपलब्ध करून द्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री.
यादव यांनी दिले.
पोलिस अधीक्षक श्री.
पंडित यांनी सांगितले, दिवाळीच्या काळात शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येतील. त्यांना महानगरपालिकेचे कर्मचारी सहकार्य करतील,
असे महानगरपालिका आयुक्त श्री.
शेख यांनी सांगितले. धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करतील.
राज्य शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करतील,
असे आश्वासन व्यापारी असोसिएशनतर्फे श्री.
बंग यांनी दिले.