शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून अहवाल सादर करावा : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा सुरू करण्याबाबत झाली आढावा बैठक




धुळे, दि. 23  (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत नववी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव पाहता शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेला घटक मानून सूक्ष्म नियोजन करीत त्याची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कृतीगट गठित करावेत. शाळा व्यवस्थापन, शिक्षण संस्था चालक, शिक्षक- पालक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळांनी केलेल्या  तयारीची पाहणी करावी. याबाबत शिक्षण विभागाने आपला अहवाल 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर करावा. त्याचा त्याच दिवशी आढावा घेण्यात येवून नववी ते बारावीच्या वर्गाची शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी दोन वाजता शाळा सुरू करण्याबाबत नियोजन, कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण उपाययोजना आदी विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. अरुण मोरे, डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले,  शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे (माध्यमिक), मनीष पवार (प्राथमिक) आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात असली, तरी धोका टळलेला नाही. त्यातच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या प्रत्येक शाळेने केलेल्या तयारीचा शिक्षण विभागाने पुढील सात दिवसांत आढावा घ्यावा. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना, शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या तयारीची देखरेख करण्यासाठी तालुकास्तरावर सनियंत्रण गट नियुक्त करावेत. तसेच शाळांकडे पुरेशा प्रमाणात थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनेटायझरची सुविधा उपलब्ध आहेत का? याचीही खात्री शिक्षण विभागाने करावी. तसेच वाहतूक आराखडा निश्चित करावा. याशिवाय किती पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत जाण्याची संमती दिली याचीही माहिती सादर करावी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी करतानाच ऑनलाइन शिक्षणाचा आढावा घ्यावा. याशिवाय ज्या गावांत गेल्या महिनाभरात कोरोना विषाणूचा एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नसेल, अशा गावांची माहिती संकलित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे यांनी सांगितले, नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या 368 शाळा असून चार हजार 857 शिक्षक आहेत. त्यापैकी  तीन हजार 413 शिक्षकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. त्यात 11 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांकडून सयुंक्त अहवाल मागविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. श्री. पवार यांनी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने