शिंदखेडा (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यात जुन ते ऑक्टोंबर महिन्यांत खरी हंगामात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापुस, मका, कडधान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबतीत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी अनेक गावांना भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे व धुळे जिल्हा पालक मंत्री ना.अब्दुल सत्तार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले होते.
धुळे जिल्हा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शेतीवर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली व शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयात तालुक्यातील प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे समवेत आढावा बैठक घेवून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित सरकारी यंत्रणेने महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर करुन धुळे जिल्ह्यासाठी 1049.26 लक्ष व शिंदखेडा व शिरपूर तालुक्यासाठी रु. 597.21 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील जुन ते ऑक्टोंबर या महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत पिकासाठी हेक्टरी दहा हजार व बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी पंचवीस हजार याप्रमाणे मदत मंजुर झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत होईल.
चालु वर्षी कोविड परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात असतांना शासनाने केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे समाधान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी व्यक्त केले आहे.