धुळे, दि.
27 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे
जिल्ह्यात केंद्र
सरकारतर्फे सातव्या
आर्थिक गणनेचे
काम सुरू
आहे. या
गणनेचे काम
15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.
या गणनेसाठी
येणाऱ्या प्रगणकांना
नागरिक, व्यावसायिकांनी
आवश्यक ती
माहिती देत
सहकार्य करावे.
त्यासाठी स्थानिक
स्वराज्य संस्थांनी
पुढाकार घेत
समन्वयक अधिकारी
नियुक्त करावेत,
असे निर्देश
जिल्हाधिकारी तथा
या योजनेचे
चार्ज ऑफिसर
संजय यादव
यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील
सातपुडा सभागृहात
आज दुपारी
सातवी आर्थिक
गणना जिल्हास्तरीय
समन्वय समितीची
बैठक आयोजित
करण्यात आली
होती. त्यावेळी
जिल्हाधिकारी श्री.
यादव बोलत
होते. यावेळी
जिल्हा सांख्यिकी
अधिकारी समीर
भालेराव, जिल्हा
विज्ञान व सूचना अधिकारी
महेश खडसे,
जिल्हा नियोजन
अधिकारी ममता
हटकर, महानगरपालिकेचे
उपायुक्त गणेश
गिरी, जिल्हा
परिषदेचे मुख्य
वित्त व लेखा अधिकारी
श्री. गांगुर्डे
आदी उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी श्री.
यादव म्हणाले,
केंद्र सरकारच्या
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी
मंत्रालयातर्फे सातवी
आर्थिक गणना करण्यात
येत आहे. केंद्र
सरकारला विविध
बाबीसंदर्भात धोरण
ठरविण्यासाठी आवश्यक
आकडेवारी उपलब्ध
व्हावी म्हणून
आर्थिक गणना
करण्यात येते.
निरनिराळे लघुउद्योग,
सेवा, लघु
निर्मिती संस्था,
आर्थिक उपक्रम
इत्यादीचा अर्थव्यवस्थेतील
वाटा, त्यात
कार्यरत असलेले
कामगार, गुंतवणूक,
यंत्रसामग्री आदींचा तसेच
यांच्या विविध
भौगोलिक क्षेत्रांनुसार
त्यांचे प्रकार,
वैशिष्ट्ये यांचा
समग्र अभ्यास
होण्याच्या दृष्टीने
त्यांची मूलभूत
माहिती एकत्रित
करणे हा
आर्थिक गणनेचा
महत्त्वाचा उद्देश
आहे.
या गणनेअंतर्गत
घरोघरी जावून
कुटुंबाच्या बाबतीत
व उद्योजकांकडे भेट देऊन
उद्योग, व्यवसाय
आणि सेवेची
गणना सुरू
आहे. ही
गणना जिल्ह्यातील
शहरी व ग्रामीण भागातील
प्रत्येक कुटुंबात
प्रत्यक्ष जाऊन
करण्यात येत
आहे. केंद्र
सरकारने नियुक्त
केलेल्या (Common Service Center) (CSC) या संस्थेचे
नियुक्त आणि
ओळखपत्र धारक
प्रतिनिधी घरोघरी
जाऊन कुटुंबातील
व्यक्तीकडून विहित
प्रश्नावलीद्वारे माहिती
संकलित करीत
आहेत.
धुळे जिल्ह्यातील
ग्रामीण भागातील
92 टक्के काम
पूर्ण झाले
असून शहरी
भागातील काम
प्रगतीपथावर आहे.
शहरी भागातील
नागरिक, व्यावसायिक
आपली माहिती
देण्यास नकार
देत असल्याचे
निदर्शनास आले
आहे. सातवी
आर्थिक गणना
ही संपूर्णत:
शासकीय गणना
आहे. धुळे
जिल्ह्यातील नागरिक,
कुटुंबीय आणि
व्यावसायिकांनी आपली,
कुटुंबीयांची तसेच
सर्व आर्थिक
उपक्रमांची, व्यवसायाची
खरी माहिती
संबंधित प्रगणकास
देणे आवश्यक
आहे. या
गणनेसाठी स्थानिक
स्वराज्य संस्थांनी
पुढाकार घेत
प्राधान्याने सहकार्य
करावे. त्यासाठी
वॉर्डनिहाय समन्वयक
अधिकारी नियुक्त
करून तसा
अहवाल सादर
करावा. शासनाच्या
अन्य विभागांनीही
या गणनेसाठी
आवश्यक ते
सहकार्य करावे.
आवश्यक तेथे
महसूल, पोलिस
आणि ग्रामविकास
विभागाने सहकार्य
करीत सातव्या
आर्थिक गणनेचे
काम 15 डिसेंबर
2020 पर्यंत पूर्ण
करावे. त्यासाठी
तालुकास्तरावर कृती
आराखडा तयार
करावा. या
कामात हलगर्जी,
दिरंगाई करणाऱ्यांविरुध्द
कार्यवाही करण्यात
येईल. याबाबत
पुढील आठवड्यात
बैठक घेवून
आढावा घेण्यात
येईल, असेही
जिल्हाधिकारी श्री.
यादव म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील
नागरिक, व्यावसायिक,
व्यापाऱ्यांनी आपल्या
कुटुंबाची तसेच
सर्व आर्थिक
उपक्रमांची व्यवसायांची
खरी माहिती
संबंधित प्रगणकास
देऊन एका
महत्वाच्या राष्ट्रीय
उपक्रमास सहकार्य
करावे. धुळे
महानगरपालिकेसह स्थानिक
स्वराज्य संस्थांनी
याबाबत नागरिकांमध्ये
जनजागृती करावी.
आर्थिक गणना
करणाऱ्या प्रगणकांनी
आपले ओळखपत्र
सोबत ठेवावे.
गणनेसाठी जाण्यापूर्वी
संबंधित पोलिस
ठाण्यात माहिती
द्यावी. तसेच
कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी
आवश्यक त्या
उपाययोजना करीत
नियम पाळावेत,
असेही त्यांनी
सांगितले.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री.
भालेराव यांनी
सातव्या आर्थिक
गणनेच्या प्रगतीची
माहिती दिली.
याबाबत कोणतीही
अधिक माहिती
आवश्यक असल्यास
नागरिकांनी जिल्हा
सांख्यिकी कार्यालय
अथवा CSC प्रतिनिधी
यांच्याशी कार्यालयीन
वेळेत अथवा
दूरध्वनीद्वारे संपर्क
साधावा. पत्ता
असा : जिल्हा
सांख्यिकी अधिकारी
कार्यालय, जिल्हाधिकारी
कार्यालय आवार,
धुळे. दूरध्वनी
क्रमांक : ०२५६२-
२९५१९१.
