मूकटी - अंगणात सांडपाणी टाकल्याचा किरकोळ कारणावरून तालुक्यातील मुकटी येथे सख्या भावंडामध्ये वादविवाद झाले.नंतर या घटनेत मारहाण झाली त्यात एकाचा मृत्यु झाला आहे.तर दुसरा भाऊ व पुतण्या गंभीर जखमी झाले आहेत.रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुकटी येथील लक्ष्मीनगरात ही घटना घडली.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.या घटनेत धनराज दौलत पाटील यांचा मृत्यु झाला असून भैय्या दौलत पाटील व रवींद्र धनराज पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी भैय्या दौलत पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून आरोपी दादा दौलत पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.फिर्यादी व आरोपी यांच्या घरासमोरच ही घटना घडली.आरोपी व त्यांचे काका सुरेश भिला पाटील यांच्यात रविवारी सकाळी सांडपाण्यावरून भांडण झाले होते.या भांडणाचे रूपांतर सायंकाळी पुन्हा मारहाणीत झाले.त्यावेळी आरोपी व काका यांच्यातला वाद सोडविणाऱ्यांवर लहान भावानेच प्राणघातक हल्ला चढविल्याने ही भीषण घटना घडली.आरोपी दादा याने त्यांचे मोठे भाऊ धनराज .भैय्या व पुतण्या रवींद्र यांच्यावर चाकूने सपासप वार केलेत.यात धनराज यांना वर्मी घाव लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.तर इतर जण गंभीर जखमी झाले.या घटनेने मुकटी गाव व परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी रात्रीतूनच आरोपीच्या मुसक्या आवळल्या याप्रकरणी भांदवि ३०२.३०७.३२४.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.बी.काळे.हे करीत आहेत.
Tags
news
