धुळे जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे पन्नास टक्के क्षमतेने होणार सुरू : जिल्हादंडाधिकारी संजय यादव

 



 

     धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील चित्रपटगृह, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. मात्र, तेथे खाण्या योग्य पदार्थांचा वापर करता येणार नाही. याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून निर्गमित होणाऱ्या नियमावलीतील सर्व अटी व शर्ती संबंधितांना बंधनकारक राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

धुळे जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या 3 नोव्हेंबर 2020 मध्ये नमूद केल्यानुसार लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी पाच नोव्हेंबर 2020 पासून धुळे जिल्ह्यात प्रतिबंधित म्हणून घोषित क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होणारे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात पुढील बाबी सुरू करण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार स्वीमिंग पूल हे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावासाठी सुरू करण्यात येत आहेत. याबाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित होणाऱ्या नियमावलीतील सर्व अटी व शर्ती संबंधितांना बंधनकारक राहतील.

योगा इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येत आहेत. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित होणाऱ्या नियमावलीतील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. सर्व इनडोअर खेळ (बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोआर, शूटिंग रेंज आदी खेळ हे शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेबाबत आवश्यक त्य उपाययोजना करून सुरू होतील.) सिनेमा हॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स इत्यादी एकूण आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेसह सुरु राहतील. तथापि, खाण्यायोग्य पदार्थांचा वापर सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्सच्या ठिकाणी करता येणार नाहीत. याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमावलीतील सर्व अटी व शर्ती संबंधितास बंधनकारक राहतील.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील.  या  आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार  शिक्षेस  संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने