शिरपूर : मुंबई येथील एस. व्ही. के. एम. संस्था संचालित एन. एम. आय. एम. एस. अभिमत विद्यापीठाच्या शिरपूर येथील "मुकेश पटेल टेक्नॉलॉजी पार्क" या शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी 'शेल' कंपनी तर्फे आयोजित 'शेल इको मॅरेथॉन-२०२०-२१' या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या पहिल्या (पिच द फ्यूचर) स्पर्धा प्रकारात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. सदर स्पर्धेत जगभरातून १३२ संघ सहभागी झाले होते.
३५ वर्षाचा इतिहास असलेल्या या स्पर्धेत जगभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहन बनविण्याचे आव्हान दिले जाते. मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग' महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकीच्या 'टीम पिनाका' या संघाने आयोजकांनी दिलेल्या विविध प्रश्नांवरील आव्हान यशस्वीरीत्या पेलून जगभरात चतुर्थ क्रमांक पटकावला आणि स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला.
शेल लुब्रीकंट्स, मायक्रोसॉफ्ट, शेल एनर्जी या जगभरात नामांकित कंपन्यांनी सन २०५० पर्यंत कार्बन मुक्त गृह ऊर्जा व्यवसाय, कार्बन शून्य मालवाहतूक, अति लांब अंतर गाठू शकणारे इलेक्ट्रिक वाहन इ. आव्हाने दिली होती. यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या भव्य देसाई व कोमल मोटवाणी या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचे हे स्पर्धेतील केवळ दुसरेच वर्ष होते हे विशेष. पहिल्या वर्षी देखील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मलेशिया येथे निवड झाली होती. जागतिक दर्जाच्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नामांकित, अतिशय खडतर अशा या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला महाविद्यालयाने सर्वोतपरी मदत केली.
सदर स्पर्धेसाठी श्री विले पार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल,
व्यवस्थापन कार्यकारिणी सदस्य राजगोपाल भंडारी यांच्या प्रेरणेने विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू डॉ. रमेश भट, प्र-कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर, शिरपूर कॅम्पसचे संचालक डॉ. आर. एस. गौड, अभियांत्रिकी ज्ञानशाखेचे प्रभारी संचालक डॉ. नारायण चांडक, मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राकेश चौधरी, समन्वयक डॉ. रजनीश कटारने, प्रा. जीवन कित्तूर आणि संपूर्ण यंत्र अभियांत्रिकी विभाग यांनी स्पर्धेच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले.
Tags
news
