प्रतिनिधी, शिरपूर
चोपडा अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि नंदुरबार जातपडताडणी समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या लताबाई माहारू कोळी (सोनवणे) यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार लताबाई सोनवणे यांचा टोकरे कोळी जातीचा दाखला नंदुरबार जातपडताडणी समितीने दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अवैध ठरवलेला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत लता सोनवणे यांनी अनुसूचित जमाती कोट्यातून उमेदवारी केली होती. आणि त्या निवडूनही आल्या होत्या. दरम्यान 25 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार तथा तक्रारदार डॉ. जगदिश वळवी व तक्रारदार एड. अर्जूनसिंग वसावे यांनी सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात नंदुरबार जातपडताडणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. लताबाई सोनवणे या कोणत्याही अनुसूचित जमातित मोडत नाहीत, त्यांचा टोकरेे कोळीचा जातीचा दाखला बेकायदेशीर आहे असा, आक्षेप घेतला होता. सदर तक्रारीची सखोल चौकशीअंती नंदुरबार जातपडताडणी समितीने लता सोनवणे यांचे जातपडताडणी प्रमाणपत्र अवैध ठरवले. यावरून त्या अनुसूचित जमातीचे नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करून, त्यांच्यावर अनुसूचित जाति, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव आणि विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताडणीचे विनियमन) अधिनियम 2000 च्या कलम 10 व 11 अन्वये कठोर कार्रवाई करावी. आणि खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्यावरही कठोर कार्रवाई ची मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे. यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुका उपाध्यक्ष राजधर पावरा,सल्लागार भारत पावरा, प्रसिद्ध प्रमुख मद्रास पावरा, काकड्या पावरा आदी उपस्थित होते.
Tags
news
