भाजप शिक्षक आघाडी नाशिक विभाग संयोजकपदी महेश मुळे यांची निवड




धुळे, दि. 12 : भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या नाशिक विभाग संयोजकपदी धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सुभाष मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आघाडीच्या प्रदेश संयोजिका डॉ. कल्पनाताई पांडे, प्रदेश प्रभारी तथा आमदार देवयानी फरांदे यांनी ही नियुक्ती केली आहे. 
पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. श्री. मुळे हे शिंदखेडा तालुक्यातील वरुळ येथील मूळ रहिवासी आहेत त्यांनी विद्यावर्धिनी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे ते गेल्या 21 वर्षापासून धुळे येथील  माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 
श्री. मुळे यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे ते विद्यार्थी परिषद,शिक्षक परिषद, जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वंयसेवक संघात ही कार्यरत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न, जुनी निवृत्तीवेतन योजना, प्लॅन, नॉन प्लॅन वेतन, शालार्थ प्रणाली, विना अट निवडश्रेणी, शिक्षक समायोजन, शालार्थ आय.डी शिक्षकांच्या विविध शैक्षणिक समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. आता भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजकपदाच्या माध्यमातून संघटन व शैक्षणिक योजनांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या कार्याची दखल घेत श्री. मुळे यांची पक्षाच्या नाशिक विभाग शिक्षक आघाडीच्या संयोजकपदी नियुक्ती केली आहे. नि:स्वार्थपणे केलेल्या कामाची ही भेट आहे. पक्ष श्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आणि विचारप्रणालीनुसार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माझ्यासह नाशिक विभागातील सर्व शिक्षक प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया श्री. मुळे यांनी व्यक्त केली आहे.श्री. मुळे यांच्या नियुक्तीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, देवयानीताई फरांदे, रवी अनासपुरे, राज्य संयोजिका डॉ. कल्पना पांडे मदनलाल मिश्रा आदींनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने