धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणू (COVID19) साथरोग अंतर्गत धुळे जिल्ह्यातील कन्टेन्मेन्ट झोन वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातंर्गत येत असलेल्या शाळा, विद्यालयातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग, वसतिगृह, आश्रमशाळा सोमवार 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यास परवागनी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अधिनियमांतर्गत प्रदान केलेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत या आदेशाच्या तरतुदी धुळे जिल्ह्यास लागू आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहितेच्या कलम 144 (1)(3) अन्वये जिल्ह्यात मनाई आदेशानुसार ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, शासन पत्र, परिपत्रकान्वये शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवसथापन अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी म्हटले आहे.
Tags
news
